जैन धर्मग्रंथांचे आधुनिकरीत्या संवर्धन

दीपक मुनोत
रविवार, 9 एप्रिल 2017

पुणे - जैन धर्मातील लाखो हस्तलिखिते, ग्रंथ यांचे संकलन करणे, त्यांची सूची तयार करून त्यांचे आधुनिक पद्धतीने संवर्धन आणि आजच्या जमान्यातील नागरिकांना समजेल अशा भाषेत अभ्यासासाठी ते उपलब्ध करून देण्याचा उपक्रम येथील श्रुतभवन संशोधन केंद्र राबवत आहे. त्यामुळे या धर्माचा आणि त्याच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणे अनुयायांना आणि अभ्यासकांना अधिक सोपे जाणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून भगवान महावीरांची शिकवण अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणे शक्‍य होणार असल्याचे या केंद्राचे प्रमुख जैन संत वैराग्यरतिविजयजी महाराज यांनी सांगितले.

भगवान महावीर यांना कठीण तपश्‍चर्येनंतर प्राप्त झालेले ज्ञान गणधरांनी (विद्वानांनी) ग्रहण केले. भगवान महावीरांच्या महानिर्वाणानंतर तब्बल एक हजार वर्षे हे ज्ञान मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला हस्तांतरित होत होते; मात्र त्यात दोष उत्पन्न होऊ लागल्याने सन 453 च्या सुमारास आचार्य क्षमाश्रमण यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाचशे आचार्यांनी ते शब्दबद्ध केले. गेल्या दीड हजार वर्षात परकी आक्रमण, मानवी चुका आणि मुद्रणदोष यांमुळे निर्माण झालेले दोष नष्ट करून अधिक शुद्ध स्वरूपात महावीरवाणी तयार करण्याचे कार्य श्रुतभवन संशोधन केंद्राद्वारे होत आहे. या ज्ञानयज्ञाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत 24 ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहेत.

या ज्ञानयज्ञाच्या स्वरूपाबाबत वैराग्यरतिविजयजी महाराज म्हणाले, 'भगवान महावीरांचा उपदेश हस्तलिखित स्वरूपात उपलब्ध झाला. त्यानंतर गेल्या दीड हजार वर्षातील परकी आक्रमणांमध्ये अनेक हस्तलिखिते नष्ट झाली. त्यातूनही सहीसलामत राहिलेल्या हस्तलिखितांची सुरक्षितता अशक्‍यप्राय झाल्याने मूळ उपदेशांची माहिती मिळणेच कठीण होऊ लागले. उपलब्ध धर्मग्रंथांमध्येही मानवी दोष होतेच. परिणामी, अर्थाचा अनर्थ होऊ लागला. मुद्रणकला उदयास आल्यानंतर छपाईयंत्राद्वारे मोठ्या संख्येने काही हस्तलिखिते पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध झाली; मात्र त्यातून अशुद्धतेचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढलेच. साधारण शंभर वर्षांपूर्वी मूळ ग्रंथांमधील दोष काही संत, विद्वान यांच्या दृष्टोत्पत्तीस आले. त्यांनी ताडपत्रांवरील मूळ हस्तलिखित मिळवून ते दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पुण्यविजयजी महाराज, जंबूविजयजी महाराज यांच्यासह अनेक संतांनी पुढाकार घेतला. हे कार्य आजही सुरू असून, त्यातील केवळ पाच टक्केच कार्य पूर्ण झाले आहे. ते वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न "श्रुतभवन'च्या माध्यमातून सुरू आहे.''

'श्रुतभवन'चे ध्येय
समग्र जैनशास्त्र बिनचूक तयार करून प्रसिद्ध करण्याचे ध्येय "श्रुतभवन'ने ठेवले आहे. इतकेच नव्हे, तर प्राचीन परंपरागत शैलीचा त्याग करत आधुनिक पद्धतीने विद्यमान आणि भावी पिढीला उपयोगी पडेल, अशा स्वरूपात ते तयार केले जात आहे. त्या दृष्टिकोनातून आगामी पाच वर्षांत बहुतांश ग्रंथांचे लिप्यांतरण केले जाईल. मूळ अर्धमागधी हस्तलिखिते/ग्रंथ हिंदी, इंग्रजी, मराठीसह विविध भाषांमध्ये उपलब्ध होतील. त्यामुळे महावीरांचा उपदेश साध्या, सरळ, सोप्या भाषेत कोणालाही उपलब्ध होईल.

संस्थेचे प्रकल्प
1) शास्त्र संशोधन प्रकल्प
- बहुतांश हस्तलिखिते अजूनही प्रकाशित झालेली नाहीत. ती भाषाशुद्धी करून प्रकाशित करणे

2) वर्धमान जिनरत्नकोश रत्न
- देशात एकूण सुमारे 70 लाख हस्तलिखिते असावीत. त्यापैकी 20 लाख जैन धर्माशी संबंधित आहेत, असा "नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट'चा अंदाज आहे. जैन हस्तलिखितांचे सूचिपत्र तयार केले जात आहे. आतापर्यंत दहा लाख हस्तलिखितांची माहिती संस्थेने मिळवली आहे. हे सूचिपत्र "वर्धमान जिनरत्नकोश' या नावाने आकारास येत आहे. प्रा. हरी दामोदर वेलणकर यांनी 1944 मध्ये "जिनरत्नकोश' प्रसिद्ध केला. त्यानंतरही मोठ्या संख्येने हस्तलिखिते उपलब्ध झाली आहेत.

3) अभ्यासवर्ग प्रकल्प
- प्राचीन हस्तलिखितांचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी कुशल मनुष्यबळ आवश्‍यक आहे. त्यासाठी संस्था संस्कृत, प्राकृत, जैन तत्त्वज्ञान आणि लिपिविद्या यांचे प्रशिक्षण देऊन पंडित (स्कॉलर) घडवत आहेत. सध्या 40 पंडित अध्ययन करत आहेत. ते चातुर्मास काळात नवीन साधू-संतांना प्राचीन भाषा आणि लिपी शिकवतील.
मूळ हस्तलिखितांच्या स्कॅन प्रती विद्यापीठे, मंदिरांमधून उपलब्ध करून देण्यात येतील. आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार हा या प्रकल्पाचा आत्मा आहे.

आतापर्यंतची कार्याची फलनिष्पत्ती :
-सुमारे तीन लाख प्रतींचे डॉक्‍युमेंटेशन (दस्तावेजीकरण)
- दोनशे हस्तलिखितांच्या आधारे 100 ग्रंथांची निर्मिती, यातील 24 ग्रंथांचे प्रकाशन

तज्ज्ञ अभ्यासकांची फौज
पद्मश्री डॉ. कुमारपाल देसाई यांच्यासह डॉ. जितेंद्र बाबूलाल शहा (डायरेक्‍टर इंडॉलॉजी), डॉ. रूपेंद्रकुमार पगारिया (वरिष्ठ संपादक), डॉ. विनया क्षीरसागर (संस्कृत विभाग) या उपक्रमात सक्रिय सहभागी आहेत. आतापर्यंत ट्रगोमिर डिमिस्ट्रोव (जर्मन), डॉ. केनेथ झिक्‍स (कोपनहेगन) आणि डॉ. पीटर प्युगन (लंडन विद्यापीठ, जैन विभाग अध्यक्ष) या परदेशी अभ्यासकांनी केंद्राला भेट देऊन त्याचा लाभ घेतला आहे. शिवाय, देशभरातून जैन धर्माचे शेकडो अभ्यासक भेट देऊन अभ्यास करून गेले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jain scripture advanced culture