
Pune News : हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचा पॅनेल; जालिंदर कामठे
पुणे : पुणे जिल्ह्यातील महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक ही उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तब्बल २२ वर्षाच्या खंडानंतर यंदा होत आहे.
या बाजार समितीवर आतापर्यंत कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता असायची. मात्या बाजार समितीच्या यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) हा पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. या निवडणुकीत भाजपचा स्वतंत्र पॅनेल उभा केला जाणार आहे.
यासाठी येत्या आठवडाभरात जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित कऱण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी मंगळवारी (ता.१७) पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवरही (पीडीसीसी) भाजपचा एकही संचालक कार्यरत नव्हता. परंतु गतवर्षी झालेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन दिग्गज संचालकांचा पराभव केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हेच पराभूत दिग्गज आणि भाजपचे हेच विजयी संचालक हे हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीशी निगडित असतील. त्यामुळे जिल्हा बॅंकेप्रमाणेच या निवडणुकीतही भाजप स्वतंत्र पॅनेल उभा करेल आणि बहुमताने भाजप ही बाजार समिती ताब्यात घेईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कामठे म्हणाले, ‘‘या कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या बावीस वर्षांपासून प्रशासकराज आहे. मात्र उच्च न्यायालयाने या बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक घेण्याचा नुकताच आदेश दिला आहे. या आदेशानुसार या बाजार समितीची निवडणूक घेण्यात येत आहे.’’