जनता वसाहतीत अर्धवट स्वच्छता (व्हिडिओ)

प्रवीण खुंटे
सोमवार, 31 डिसेंबर 2018

पुणे - स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात भिंती रंगविण्याचे काम सुरू आहे. मात्र, जनता वसाहतीतील गल्ली क्रमांक ४९ मध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. गेल्या १५ दिवसांपासून त्याकडे कोणी फिरकलेही नाही. याची दखल ‘सकाळ’ने घेत २ डिसेंबरच्या अंकात संबंधित समस्येबाबत प्रकाशझोत टाकला. त्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले अन कचरा उचलण्याचे काम हाती घेतले; परंतु, महिन्याचा कालावधी संपत आला तरी ते काम पूर्ण होऊ शकले नाही.

अर्धवट पसरलेला कचरा उचलण्यासाठी १५ दिवसांपासून महापालिकेचे कर्मचारी फिरकले नसल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्याचा विपरीत परिणाम लहान मुले, वृद्ध नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. कचऱ्यामुळे डास, डुकरे, उंदीर, घुशी, गांडूळ, झुरळांचे प्रमाण वाढले आहे. अशा वातावरणात शेकडो कुटुंब येथे राहत आहेत. 

काही नागरिकांच्या घरांच्या भिंतीला खेटून कचऱ्याची पोती तशीच भरून ठेवली आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी यांच्याकडून केवळ आश्‍वासने मिळत असल्याचे रहिवासी सांगत आहेत; परंतु या प्रश्‍नाकडे कोणीही लक्ष देत नाही. 

याबाबत स्थानिक रहिवासी बानू आलुरे म्हणाल्या, ‘‘किती वर्षांपासून हा कचरा इथेच पडून आहे. दुर्गंधीमुळे नातेवाईकही घरी येत नाहीत. इथे राहणाऱ्या नागरिकांचा बराच खर्च दवाखान्यावरच होत असतो. सर्दी, खोकला, थंडी-तापाने लहान मुले नेहमीच आजारी पडतात.’’

आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून कचरा उचलण्याचे काम सुरू केले होते. त्यातील अर्धा कचरा उचलून झालेला आहे. हे काम का थांबले, याची माहिती घेऊन दोन-तीन दिवसांमध्येच संपूर्ण कचरा उचलला जावा, यासाठी पाठपुरावा केला जाईल.
- आनंद रिठे, स्थानिक नगरसेवक

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कचरा उचलण्याचे काम सुरू केले आहे. निम्म्यापेक्षा जास्त कचरा उचलला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये आणखी कर्मचारी कामाला लावून संपूर्ण कचरा साफ केला जाईल. नागरिकांकडूनही पुन्हा कचरा होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.
- संतोष तांदळे, प्रभारी सहायक आयुक्त, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय

Web Title: Janata Colony Uncleaned Municipal