
पुणे महापालिकेने सुमारे १५ वर्षापूर्वी संभाजी उद्याना समोर तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून हे मेकॅनिकल वाहनतळ उभारले.
पुणे : जंगली महाराज रस्त्यावरील मेकॅनिकल वाहनतळ मेट्रोला देण्याची तयारी
पुणे - जंगली महाराज रस्त्यावर महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेले मेकॅनिकल वाहनतळ बंद आहे. हे वाहनतळ महामेट्रोने चालविण्यास घ्यावे. त्यापोटी महापालिकेला एक वर्षाला ६ लाख रुपये द्यावेत असा प्रस्ताव प्रकल्प विभागाने महामेट्रोला पाठवला आहे. संभाजी उद्यान येते मेट्रो स्टेशन आहे, त्यामुळे या मेकॅनिकल वाहनतळाचा उपयोग होऊ शकतो, त्यामुळे हा प्रस्ताव देण्यात आला आहे.
पुणे महापालिकेने सुमारे १५ वर्षापूर्वी संभाजी उद्यानासमोर तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून हे मेकॅनिकल वाहनतळ उभारले. ठेकेदारामार्फत ते चालविण्यासाठी देण्यात आले होते. पण त्यास अपेक्षीत उत्पन्न मिळत नसल्याने हे वाहनतळ बंद झाले. त्यानंतर महापालिकेने निविदा काढून पुन्हा हे ठेकेदारास देण्याचा प्रयत्न केला, पण त्यास प्रतिसाद मिळाला नाही. महापालिकेने स्वतःचे कर्मचारी देऊन हे वाहनतळ चालवावे अशी मागणी करण्यात आली होती, पण ती व्यवहार्य नसल्याने वाहनतळ गेल्या काही वर्षापासून बंद पडून आहे.
वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गावर संभाजी उद्यान येथे मेट्रो स्टेशनचे काम सुरू आहे, पुढील काही महिन्यात तेथून मेट्रोसेवा सुरू होणार आहे. जंगली महाराज रस्त्यावर या वाहनतळाच्या समोरच मेट्रो स्टेशनचा जिना, एक्सलेटर येणार आहे. त्यामुळे या वाहनतळाचा वापर मेट्रोसाठी फायदेशीर होऊ शकत असल्याने प्रकल्प विभागाने मेट्रोकडे हे वाहनतळ चालविण्यासाठी विचारणा केली होती, त्यास महामेट्रोने हिरवा कंदील दर्शविला आहे. त्यानंतर प्रकल्प विभागाने महामेट्रोला अटी शर्तींसह प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, महापालिकेला यासंदर्भात महामेट्रोने उत्तर दिलेले नाही.
असा आहे प्रस्ताव
- वाहनतळाची दुरुस्ती करून ते वापरात आणावे
- महापालिकेला वर्षाला ६.८ लाख रुपये भाडे द्यावे
- वाहनतळाची क्षमता ८० चारचाकीची आहे, महापालिकेच्या धोरणानुसार चारचाकीसाठी प्रतितास १४ रुपये शुल्क घेत येईल.
- वाहनतळाचे वीज बिल, अंतर्गत दुरुस्ती, ल्युब्रिकेशन, ॲडेस्टमेंट, चेन रोप, स्पेअर पार्टचा खर्च मेट्रोला करावा लागेल.
- जाहिरातीच्या माध्यमातून महामेट्रो उत्पन्न मिळवू शकते.
Web Title: Jangali Maharaj Is Preparing To Hand Over Mechanical Parking To Metro
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..