मूलभूत सुविधांबरोबरच शहराच्या वैभवात भर टाकणारी विकासकामे करणार .. नगराध्यक्षा जयश्री भिसे..कुर्डुवाडी शहर माझे कुटुंब
जयश्री भिसे
KDW26B04782
मूलभूत प्रश्न प्राधान्याने सोडविणार अन् विकासकामांसाठी करणार पाठपुरावा
कुर्डुवाडीच्या नगराध्यक्षा जयश्री भिसे; प्रत्येकाच्या कुटुंबात एक झाड देणार, नाट्यगृह, क्रीडासंकुल करणार
विजयकुमार कन्हेरे ः सकाळ वृत्तसेवा
कुर्डुवाडी, ता. २० : राज्यात सर्वत्र भाजपचे वारे वाहत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विजयी झालेल्या नगराध्यक्षा म्हणून जिल्ह्यात गाजल्या. शिवसेनेची सत्ता अबाधित ठेवण्यात त्यांनी यश मिळविले आहे. मध्यरेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन असलेल्या कुर्डुवाडी शहरातील नागरिकांचे स्वच्छता, रस्ते, वीज असे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य असल्याचे सांगत शहर म्हणजे माझे कुटुंबच असल्याचे सांगितले. शहराच्या वैभवात भर टाकणारी विकासकामे करणार असल्याची ग्वाही नगराध्यक्षा जयश्री संतोष भिसे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
प्रश्न ः नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला असून शहरासाठी प्रथम आपण काय करणार आहात ?
उत्तर- पदभार स्वीकारल्यानंतर विशेष म्हणजे स्वच्छतेची मोहीम सुरू केली आहे. सध्या दररोज सकाळी ६ वा. नगरपरिषदेच्या कार्यालयाजवळ मी स्वतः, स्वच्छता विभागाचे अधिकारी, मुकादम व कर्मचारी उपस्थित राहून शहराच्या कोणत्या भागात कशा पद्धतीने स्वच्छता करावयाची याबाबत नियोजन करते. शहरातील जवळपास सर्व प्रभागात विशेष स्वच्छता मोहीम राबवली आहे.
-
प्रश्न ः नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांचे डिपॉझिट व भाडे सर्वसामान्य व्यावसायिकांना परवडत नाही अन् गाळेही रिकामे राहिले आहेत, याबाबत आपण काय तोडगा काढणार आहात ?
उत्तर ः शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांमध्ये एखाद्याने गाळा भाड्याने घेतला तो गाळा सोडताना त्याला डिपॉझिट परत मिळाले पाहिजे. शहरातील बाजारपेठेची भरभराट होण्यासाठी व्यवसायवाढ होणे गरजेचे आहे. शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांचे सर्वसामान्यांना परवडणारे डिपॉझिट व भाडे कमी व्हावे, यासाठी माहिती घेऊन शासनाच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणार आहे.
प्रश्न ः शहरातील पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन जीर्ण झाली असून, त्याबाबत आपण काय करणार आहात ?
उत्तर ः शहरातील सर्व नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यासाठी जीर्ण पाइपलाइन बदलण्यासाठी आधीच मंजुरी मिळाली आहे. याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
प्रश्न ः शहरात सीसीटीव्ही बसवणार आहात का?
उत्तर ः शहरातील मुख्य चौकात, रस्त्यांवर तसेच शाळा कॉलेजच्या रस्त्यांवर सीसीटीव्ही बसविण्याचा विचार आहे. यामुळे रोडरोमिओंचा त्रास होणार नाही. तसेच काही ठिकाणी वाद, भांडणे झाली तर त्यात निर्दोष व्यक्तींना त्रास होणार नाही. सीसीटीव्हीमुळे अनेक वाईट गोष्टींना आळा बसण्यास फायदा होईल.
-
प्रश्न ः जनतेला आपल्याकडे समस्या, प्रश्न मांडायला नागरिकांसाठी ठराविक कार्यालयीन वेळ ठेवली आहे का ?
उत्तर ः मी सतत जनतेत, नागरिकांत असल्याने नागरिक थेट माझ्याशी संवाद साधून प्रश्न मांडतात. गेल्या काही दिवसांत मी शहराच्या सर्व भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. स्वच्छता मोहीम राबवताना मी स्वतः त्या भागातील नागरिकांनी संवाद साधला आहे. तसेच नगरपरिषदेच्या कार्यालयात मी कामकाजासाठी व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी उपस्थित असते.
-
प्रश्न ः येत्या कालावधीत शहरातील कोणकोणती विकासकामे करण्याचे नियोजन आहे ?
उत्तर ः कुर्डुवाडी शहराला सांस्कृतिक वारसा आहे. शहरात एखादे सुसज्ज नाट्यगृह करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. लहान मुलांसाठी सर्व प्रकारची खेळणी असलेले बालोद्यान तसेच सर्व साहित्य असलेले क्रीडासंकुल उभे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले गोदाम नगरपालिकेकडे घेण्यासाठी सखोल माहिती घेऊन शासन स्तरावर
प्रक्रिया सुरू करणार आहे. शहरात विविध शासकीय कार्यालये यावीत संबंधित विभागांच्या वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणार आहे.
प्रश्न ः शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी काही विशेष योजना आहे का ?
उत्तर ः नागरिकांच्या सहभागाने वृक्षारोपणाचा नियोजनबद्ध मोठा उपक्रम राबवणार आहे. शहरातील सर्व दुकानदार, घरमालक यांना घरासमोर लावण्यासाठी आम्ही चांगले रोपटे, झाडे देणार आहोत. त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी नागरिकांकडे देणार आहोत. यामुळे शहरात शुद्ध हवा तर मिळेलच त्याचबरोबर वातावरण प्रसन्न होऊन शहराच्या सौंदर्यात भर पडेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

