उदयनराजेंच्या डोक्‍यात अजूनही सरंजामशाही

avhad
avhad

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची टीका

सोमेश्वरनगर (पुणे) :""उदयनराजे यांच्या डोक्‍यात अजूनही सरंजामशाहीच आहे. जगात लोकशाही आहे, कायद्याने सर्वजण समान आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेद्वारे सर्वांना एका कक्षेत आणले आहे, हे समजून घेण्याच्या मूडमध्ये ते अजूनही नाहीत. जनतेने पराभव केल्यानंतरही प्रजातंत्र सर्वश्रेष्ठ आहे, हे त्यांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या लक्षात येत नाही,'' अशी टीका राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.


करंजेपूल (ता. बारामती) येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी आव्हाड यांनी भेट दिली. सोमेश्वर कारखान्यावर ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुरू असलेल्या "आशा' प्रकल्पाची माहिती व पुस्तके संचालक विशाल गायकवाड, बाळासाहेब गायकवाड यांनी त्यांना भेट दिली. मराठा क्रांती मोर्चाने आव्हाड व खासदार संजय राऊत यांना "ठोकून काढू' अशी धमकी दिली होती; त्यावर आव्हाड बोलत होते.


""ते महाराज आहेत. कुणालाही मारू शकतात. आम्ही अजूनही सामान्य प्रजा आहोत,'' असे सांगून आव्हाड म्हणाले, ""भाजप गोयल प्रकरणाशी संबंध नाही म्हणते, तर प्रकाश जावडेकरांनी पुस्तक मागे घेण्याची घोषणा का केली? पुन्हा काल भाजप आमदाराने, "मोदींमुळे शिवरायांची उंची वाढली,' असे भाष्य केले. यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेली फळी आणि भाजपच्या मनातली महाराजांबद्दलची असूया लक्षात येते. यावर उत्तर द्यावे.''


सीएए, एनआरसी हा बहुजनांविरुद्धचा डाव आहे. बेरड, बुरूड, पारधी, वडार, वंजारी, जोशी, गोसावी अशा भटक्‍या विमुक्तांकडे, बहुजनांकडे काय रेकॉर्ड आहे? जमिनीचा तुकडा नाही, वास्तव्याचा दाखला नाही, त्यांचे काय करणार, असा सवाल त्यांनी केला.

 
"गृहनिर्माण 90 दिवसांत जिवंत करणार'
देशाचे अर्थकारण डबघाईला गेल्याने गृहनिर्माण उद्योगही अडचणीत आहे. यावर 268 प्रकारचे छोटे-मोठे व्यावसायिक जगतात. वेगवेगळ्या प्रयोगांतून बिल्डर जिवंत ठेवून गरिबांना परवडतील अशी घरे देण्यासाठी व या इंडस्ट्रीला तीन महिन्यांत सुगीचे दिवस आणण्यासाठी शरद पवार यांनी मला गृहनिर्माण मंत्रिपद दिले आहे. गरिबांच्या, मध्यमवर्गीयांच्या घरांसाठी बॅंकांशी बोलतोय, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच, सरकार अर्थसंकल्पाच्या आधी नवीन योजना आणून कर्जमुक्ती योजनेत उर्वरित शेतकऱ्यांना न्याय देणार आहे, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com