सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा

सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा
Published on

नोकरीचे आमिष, ऑनलाइन जाळे
लाखोंची फसवणूक

- डॉ. प्रियांका शिंदे, समन्वयक, सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा
अनिकेत धोत्रे, सायबर योद्धा, क्विक हिल फाउंडेशन, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कऱ्हाड

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आकर्षक पगाराचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रकार झपाट्याने वाढत आहेत. समाजमाध्यमे, मेसेजिंग ॲप्स आणि बनावट संकेतस्थळांच्या माध्यमातून गुन्हेगार नामांकित कंपन्या किंवा सरकारी विभागांच्या नावाचा वापर करून खोट्या जाहिराती प्रसारित करून फसवणूक होते. त्‍यामुळे आजच्‍या स्‍थितीत तरुणांसह सर्वांनीच सावध राहण्याची गरज आहे.

जाळे कसे विणले जाते?

सुरुवात होते एका आकर्षक जाहिरातीने. ‘‘घरबसल्या काम’’, ‘‘अनुभवाची गरज नाही’’, ‘‘तत्काळ नियुक्ती’’ किंवा भरघोस पगार अशा शब्दांनी लक्ष वेधले जाते. त्यानंतर नोंदणी शुल्क, प्रशिक्षण शुल्क किंवा कागदपत्र पडताळणीच्या नावाखाली पैसे मागितले जातात.
विश्वास बसावा म्हणून बनावट नियुक्तिपत्र, ओळखपत्र आणि कंपनीचे संकेतस्थळही तयार केले जाते. उमेदवाराकडून आधार क्रमांक, पॅन कार्ड आणि बँक खात्याची माहिती मागितली जाते. पैसे आणि माहिती हाती लागताच संपर्क तुटतो. इथे आर्थिक नुकसानासोबतच वैयक्तिक माहितीच्या गैरवापराचा दुहेरी धोका असतो.

गंभीर उदाहरणे

पुणे परिसरातील एका प्रकरणात ११७ नोकरी इच्छुकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिस तपासात समोर आले. बनावट निवड यादी, नियुक्तिपत्रे आणि प्रशिक्षणाच्या नावाखाली उमेदवारांना जाळ्यात ओढण्यात आले. नोएडा येथेही बनावट विमान कंपनीच्या नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला.

फसवणूक टाळण्यासाठी काय करावे?

जाहिरात मिळाल्यावर कंपनीचे अधिकृत संकेतस्थळ स्वतः तपासा.

भरती प्रक्रियेची माहिती कंपनीच्या अधिकृत माध्यमातूनच पडताळा.

जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर नव्हे, तर कंपनीच्या अधिकृत क्रमांकावर संपर्क साधा.

अनोळखी लिंकवर क्लिक करून कागदपत्रे किंवा बँकेची माहिती देऊ नका.

‘‘आत्ताच पैसे भरा, नाहीतर संधी जाईल’’ या दबावाला बळी पडू नका. घाई निर्माण करणे हेच फसवणुकीचे मुख्य लक्षण आहे. कागदपत्रे पाठवण्यापूर्वी त्यांची खरोखर गरज आहे का आणि प्राप्तकर्ता खरा आहे का?’’ हे निश्चित करा.

पालकांसाठी विशेष सूचना :
घरातील तरुण मुलगा किंवा मुलगी नोकरीच्या शोधात असेल, तर त्यांना ही माहिती द्या. बेरोजगारीची चिंता आणि कुटुंबाची अपेक्षा, या दोन्ही दबावांमुळे तरुण घाईने निर्णय घेतात आणि गुन्हेगार नेमक्या याच मानसिकतेवर घाव घालतात.

फसवणूक झाल्यास :
विलंब न करता १९३० या सायबर गुन्हे हेल्पलाइनवर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा. संदेश, पावत्या, नियुक्तिपत्र आणि व्यवहाराचे सर्व तपशील पुरावा म्हणून जतन करा.

नोकरीच्या शोधात असलेल्या प्रत्येक तरुणासाठी आज एकच संदेश महत्त्वाचा आहे, ‘‘आकर्षक ऑफरपेक्षा तिची सत्यता अधिक महत्त्वाची!’’

श्री गणेशाचा कानमंत्र :
‘‘नोकरी पैसे देते, पैसे घेत नाही. जो नोकरीसाठी पैसे मागतो, तो नोकरी देणारा नसतोच.’’
खरी कंपनी उमेदवाराकडून नोंदणी, प्रशिक्षण किंवा पडताळणीसाठी शुल्क मागत नाही. ही एकच गोष्ट लक्षात ठेवली, तरी बहुतेक फसवणूक तिथेच थांबते.

डिजिटल दूर्वाची जुडी :
घरातल्या नोकरी शोधणाऱ्या तरुणाला आजचा लेख स्वतः वाचायला द्या.

क्‍यूआर कोड :
तुमचा अनुभव, तुमचा प्रश्न कोणाचा तरी सायबर गुन्ह्यापासून बचाव करू शकतो, नक्की संपर्क साधा.
..................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com