भाविकांचे श्रद्धास्थान जाऊजीबुवा देवस्थान

भाविकांचे श्रद्धास्थान जाऊजीबुवा देवस्थान

जाऊजीबुवाचीवाडी (ता. दौंड) येथील जाऊजीबुवा देव पुणे जिल्ह्यातील सर्व भक्तांच्या नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिद्ध आहे. जाऊजीबुवा देवस्थान हे मूळ चिखली गणेश नगर (मोशी) येथील आहे. तेथे जाऊजीबुवांचे भव्यदिव्य मंदिर बांधण्यात आले आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावरून जाताना लमाण समाजाच्या तांड्यामध्ये असणाऱ्या गाईच्या खुरामधून जाऊजीबुवाची वाडी येथे एक छोटा खडा पडला. या खड्याला भाविकांनी जाऊजीबुवांचे प्रतिरूप मानले. भाविकांनी खडा पडलेल्या ठिकाणीच जाऊजीबुवा मंदिर उभारले अशी आख्यायिका आहे. पूर्वी चुनखडी व मातीचे जुने मंदिर होते. या मंदिराचे सभागृह ६० बाय ४० फुटांचे होते मंदिरासकट पडवी होती. समोर मंडप ४० बाय ४० फुटाचा होता. २००४मध्ये चोरमले आडनावाच्या जाऊजीबुवांच्या वंशजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पुणे-सोलापूर महामार्गाच्या कडेला भव्यदिव्य मंदिर बांधण्यात आले. या मंदिराला एकच ५१ फूट उंच कळस असून मंदिराचे मुख्य सभागृह १११ बाय ४० फूट आहे. मंदिरामध्ये जाऊजीबुवांच्या मूर्ती सोबत त्यांचे मोठे बंधू सगबाबा, धाकटे बंधू यशबाबा व गंगाराम यांच्या मूर्ती साकारलेल्या आहेत.

मंदिर उभारण्यासाठी फंड
मुख्य सभागृहामध्ये वाळू व सिमेंटने बनवलेला जाऊजीबुवा देवाचे वाहन असणारा घोडा साकारण्यात आला आहे. देवासमोर जाऊजीबुवांचे मामा टकले आडनावाच्या व्यक्तीची मूर्ती साकारण्यात आली आहे. मंदिरासमोर एक दीपमाळ असून शेजारी लक्ष्मीआई, सटवाई मंदिरे आहेत. जाऊजीबुवांचे भाऊ सगबाबांचे वंशज सिद्धेश्वर चोरमले हे देवाची भाकणूक करतात. लक्ष्मण चोरमले व नामदेव चोरमले यांना देवाची पूजा करण्याचा मान आहे. गंगाराम तुकाराम चोरमले व गंगाराम बाळू चोरमले हे जाऊजीबुवा देवस्थानचे सर्व आर्थिक व्यवहार पाहत असतात. विशेष म्हणजे जाऊजीबुवांचे बंधू सगबाबांचे तेरावे वंशज (चोरमले आडनावाचे )या गावामध्ये राहतात. या वंशजांनी मंदिर उभारण्यासाठी स्वतःचा फंड उभारला. दरमहा ठराविक रक्कम या फंडामध्ये जमा केली. या फंडातूनच जाऊजीबुवाची वाडी येथे २००४ मध्ये भव्य दिव्य मंदिर साकारले आहे.

दिवाळीच्या काळात यात्रा
काही दिवसापूर्वी मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली आहे. दसऱ्यानंतर १० दिवसांनी या मंदिरामध्ये घटस्थापना होते. या काळामध्ये गावातील १०० भाविक या मंदिरामध्ये उपवास करतात व १० दिवस मुक्काम करतात. या भाविकांना सर्वजण स्वच्छेने उपवासासाठी वेगवेगळे फराळाचे पदार्थ आणून देतात. दीपावली भाऊबीज व पाडव्याला या देवाची यात्रा भरते. यावेळी देवाचा अभिषेक केला जातो. देवाला नव्याने घोंगडी, फेटा व काठी पायामध्ये जोडे परिधान केले जातात. गावामध्ये लोकनाट्य तमाशा असतो. होलार समाज बांधवांना डफडी वाजवण्याचा मान असतो. चोरमले यांना मुख्य मंदिराचा मान असतो. शेलार यांना घटस्थापनेचा मान, चितळकर यांना पखालीचा मान, चव्हाण यांना झेंडा व निशाण लावण्याचा मान व अनपट यांना घोड्याचा मान असतो. प्रत्येक श्रावणी पौर्णिमेला या ठिकाणी पुरणपोळीचा भंडारा असतो.

एकत्रित पुरणपोळीचा आस्वाद
संपूर्ण जाऊजीबुवावाडी गावकुसाबाहेर जाणे या संकल्पनेखाली स्वतः या मंदिरामध्ये येते व एकत्रित बसून पुरणपोळीचा आस्वाद घेते. १९९९मध्ये पुणे-सोलापूर महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम चालू असताना संबंधित कर्मचाऱ्यांना दुर्बिणीतून रोडचे मोजमाप करताना रस्त्याच्या कडेला असणारे मंदिर दिसत नव्हते. रस्ता सरळ झाला असता तर कदाचित मंदिराला धक्का पोहोचला असता. त्यामुळे मंदिर बाजूला बांधावे लागले असते. अखेर सार्वजनिक बांधकाम खात्याला साक्षात्कार घडल्याने त्यांनी नियमावली बदलून या ठिकाणी वळसा घेत पुणे- सोलापूर महामार्ग पुढे नेला अशी माहिती जाऊजीबुवावाडी ग्रामस्थांनी दिली. यावरून या देवाचे महत्त्व लक्षात येते. अनेकजण नवस केल्यावर येथे देवाला घोडा वाहतात, देवाच्या शेजारी बकरी कापतात. परंतु, मंदिरामध्ये मांसाहारी नैवेद्य नेला जात नाही. तो नैवेद्य मंदिरासमोर ठेवला जातो. प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला लोक या देवाला पाणी घालतात. बाजार समितीचे संचालक संतोष आखाडे यांनी आपले बंधू कै. रामदास
आखाडे यांच्या स्मरणार्थ भाविकांना बसण्यासाठी ४ बाक दिले आहेत. याशिवाय आखाडे परिवाराने मोशी येथील मंदिरासाठी लोकवर्गणी दिली आहे.

रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना साक्षात्कार
प्रत्येक दीपावलीनंतर रेल्वे खात्याचे कर्मचारी या देवाला नवसाचे बकरं कापतात. व आपला नवस फेडतात. रेल्वे खात्याचा पूल करण्यासाठी या देवाने साक्षात्कार दिल्याची माहिती एका कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

गावामध्येच पुणे-सोलापूर महामार्गाच्या कडेला विठ्ठल रुक्मिणी मंदिर असून हे मंदिर १९९९ मध्ये आयआरबी कंपनीने बांधून दिले आहे. मंदिराला प्रशस्त सभागृह असून दररोज भाविक व ग्रामस्थ या ठिकाणी विश्रांती घेत असतात. याशिवाय कै. रामदास आखाडे स्मरणार्थ लावलेला ‘आय लव्ह जाऊजीबुवावाडी’ असा बोर्ड येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com