पुण्याची ओळख जुनीच चेहरा बदलतोय!

पुण्याची ओळख जुनीच चेहरा बदलतोय!

कोणत्या तरी पक्षाच्या विकासाचं स्वप्न मेट्रोच्या रूपाने साकार होत आहे. मेट्रो योग्य-अयोग्य हा प्रश्‍न आता मागे पडलाय. त्याबाबत पुणेकरांनाच अधिक माहिती आहे. पण त्यामुळे शहरांचं स्पिरीट बदलतंय. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मेट्रोचे डबे रुळावर आले आहेत. उंच खांबावरील रुळांवरून धावणारी ही अत्याधुनिक, अद्ययावत मेट्रो शहरात नक्की काय बदल घडवून आणेल, याबाद्दलचं एक कुतूहल.

गेल्या वर्षभरातील कामांनी मेट्रो मार्गाच्या बाजूचे रस्ते आणि चौकांचे स्वरूप बदलून गेले आहे. सध्या सुरू असलेल्या कामांमुळे नित्याचा असणारा एखादा चौकही पटकन लक्षात येत नाही. कोणत्याही शहराची ओळख ही तिथल्या नागरिकांची अभिरुची, राबवले जाणारे उपक्रम, प्रश्‍नांवर होणारी चर्चा आणि नागरिकांचा सहभाग (इन्व्हॉलमेंट) यावरून ठरते. मात्र तेथील रस्ते, व्यापार, दळणवळण, दैनंदिन व्यवहार यावरून शहराचा चेहरा ठरत असावा. कदाचित, पुण्याची ओळख विद्येचे माहेरघर अन्‌ विचारवंतांची नगरी अशीच राहील, पण आता मेट्रोमुळे पुणे आणि पिंपरीचा चेहरा बदलतोय, एवढं मात्र नक्की. पुणेकरांना विविध विषयांवर चर्चा करायला नेहमची आवडते. राजकीय, सामाजिक चर्चाही काही ठिकाणही ठरलेली आहेत. मेट्रोमुळे या जागा कदाचित बदलतील. शहराचं सेंटर ऑफ ऍट्रॅक्‍शनही फर्ग्युसन रस्त्यावरून मेट्रोलाइनला समांतर कुठेतरी जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. पुण्यातील रस्त्यांना त्यांच्या खऱ्या नावांनी कधीच ओळखलं जात नाही. आता अशा नव्या चौकांची भर पडेल. जसे, मेट्रो जंक्‍शन, मेट्रो टर्न. काय सांगावे, "बुलेट चहा'सारखा "मेट्रो चहा'ही कुठेतरी सुरू होईल. कॉलेजच्या मित्रांची भेटण्याची ठिकाणे बदलतील. सहजच कुणी म्हणेल, "मेट्रो जंक्‍शनला भेटू'. मेट्रोचं तिकीट काढण्यापासून प्रवास पूर्ण होईपर्यंत नव्या ओळखी इथं होतील.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मेट्रोची कामे सुरू असताना रस्त्याच्या बाजूच्या छोट्या व्यावसायिकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. त्याबाबत कधीतरी वनाझ चौकात तुम्ही नाश्‍ता करायला गेलात, तर तिथला व्यावसायिक मेट्रोला दूषणे देताना दिसेल. पण हीच मेट्रो नव्याने रोजगारही उपलब्ध करून देईल. एखाद्या भाजीवालीला मेट्रो स्टेशनजवळ व्यवसाय चालविण्यात समाधान मिळेल, त्याच वेळी "बघा, एवढी मेट्रो झाली शहरात, पण यांच्यामुळे बकालपणा आला,' अशी खोचक प्रतिक्रियाही एखादा पुणेकर देईल. तिकीटदर परवडणारा नसेल तर पुणेकरांमध्ये मेट्रोने प्रवास करणारा नवा वर्ग तयार होईल. तर आमच्या भागात प्रवास कसा सुखद झाला आहे, असे सांगताना उपनगरातील नागरिकांचा ऊर अभिमानाने भरून येईल. राजकीय पक्षांना मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांसाठी नवा अजेंडा तयार करावा लागेल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पत्रकारांना बातम्या मिळतील, तर व्यापारी, कामगारांना नव्या संधी निर्माण होतील. प्रशासन, पोलिसांसमोर नवी आव्हाने असतीलच. काही कारणांनी पुणेकरांना त्रास होऊ नये, अन्यथा आपल्या परीने सल्ला द्यायला ते पुढे येतीलच. कुणी खुशालचेंडू मेट्रोतून फिरतील अन्‌ शहराचं नाइट लाइफही बदलेल. वाहतुकीची समस्या सुटली किंवा काही अंशी कमी झाली, तरी मेट्रोसारखे दुसरे यश नाही. पण नाही सुटली तर, नवे प्रश्‍न तयार होतील. काही असो, लवकरच पुणेकरांचे आणि मेट्रोचं नवीन नातं तयार होईल आणि शहराची सुख - दु:ख, नागरी समस्या घेऊन कधी शिक्षण, व्यवसाय, प्रवास यासाठी तरुणांपासून अबालवृद्धांना मदत करत मेट्रोही शहरवासीयांबरोबर धावेल. नवे प्रश्‍न घेऊन मेट्रो रुळावर येतेय, की शहराचे जीवनमान ट्रॅकवर आणून ती सर्वांना बरोबर घेऊन सुसाट धावतेय, हे मात्र मेट्रोच येत्या वर्षभरात ठरवेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com