विरंगुळा आणि बौद्धिक व्यायाम साधण्याचा आनंद

नीला शर्मा
Friday, 10 April 2020

विरंगुळा आणि बौद्धिक व्यायाम साधण्याचा आनंद मिळवण्यासाठी क्षमा एरंडे यांनी निवृत्तीनंतर शब्दकोडी तयार करायचा छंद जोपासला आहे. यातून त्यांच्या स्वतःच्या व ती कोडी सोडवणाऱ्यांच्या स्मरणशक्तीला चालना मिळते. विरंगुळा आणि बौद्धिक व्यायाम साधण्याचा आनंद मिळतो. चार वर्षांत तयार झालेल्या एक हजार कोड्यांचा संग्रह प्रकाशित करायच्या तयारीत त्या सध्या गढल्या आहेत.

विरंगुळा आणि बौद्धिक व्यायाम साधण्याचा आनंद मिळवण्यासाठी क्षमा एरंडे यांनी निवृत्तीनंतर शब्दकोडी तयार करायचा छंद जोपासला आहे. यातून त्यांच्या स्वतःच्या व ती कोडी सोडवणाऱ्यांच्या स्मरणशक्तीला चालना मिळते. विरंगुळा आणि बौद्धिक व्यायाम साधण्याचा आनंद मिळतो. चार वर्षांत तयार झालेल्या एक हजार कोड्यांचा संग्रह प्रकाशित करायच्या तयारीत त्या सध्या गढल्या आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

क्षमा एरंडे यांनी वर्षानुवर्षे वर्तमानपत्रं व नियतकालिकांमध्ये येणारी शब्दकोडी सोडवली. निवृत्तीनंतर मात्र त्यांना आपणच काही कोडी तयार करून पाहूया, असं वाटलं. त्यांनी लगेच काम सुरू केलं आणि त्यांची ही निर्मिती बहरत गेली. बघता-बघता त्यांनी तयार केलेल्या कोड्याची संख्या हजाराच्या जवळ येऊन ठेपली आहे. त्या म्हणाल्या, ‘‘दुसऱ्यांनी तयार केलेली कोडी सोडवताना अडवणारे शब्द लिहून ठेवायला मी एक वही केली होती. अशा शब्दांचा संग्रह भरपूर वाढत गेला. अडवणार शब्द कोणता असेल, याचा विचार करताना निरनिराळे शब्द आठवायचे. हा चाळा मजेशीर होता.

यातूनच मी स्वतः काही कोडी तयार करून पाहिली. आधी व्हॉटस अपवर नातेवाईक आणि परिचितांना पाठवली. याला उत्तम प्रतिसाद आणि प्रोत्साहन मिळालं. काही सूचनाही मिळत गेल्या. त्यानुसार मी नवनव्या विषयांवर आधारित कोडी रचली. कधी म्हणी व वाक्‍प्रचार, कधी चित्रपटांची नावं, साहित्यिकांची नावं वगैरेंचा समावेश त्यात केला.’’

क्षमाताई तयार करतात ती कोडी काळ्या-पांढऱ्या चौकोनांमध्ये बसलेल्या अक्षरांची नसतात. त्या संकेत देतात. उदाहरणार्थ, सुरवातीच्या सर्व अक्षरावर अनुस्वार आहे. पुढे वर्णन दिलेलं असतं. कुठल्या ऋतू किंवा सणाबाबत आहे, ते तर शीर्षकात दिलेलंच असतं. तीन किंवा चार अक्षरी वगैरे मर्यादाही सुचवलेली असते. मराठी, हिंदी व इंग्रजी शब्दांचा आधार घेऊनही ही कोडी रचलेली आहेत. काही वेळा एका चौकटीत अनेक चित्रं देऊन, ‘‘यावरून किती अन्‌ कोणकोणते चित्रपट आठवतात, अशी खेळीही केलेली आहे. बालगोपाळांना आवडतील अशी कोडीही त्या रचतात.’’ 

क्षमाताईंनी सांगितलं की, छापील शब्दकोशाबरोबरच मी गूगलची मदतही घेते. फेसबुकवरही मी कोडी टाकते. ती नियमितपणे सोडवणारे अनेकजण आहेत. माझ्या मैत्रिणी म्हणतात की, यामुळे आमच्या मेंदूला सतत चालना मिळत असल्याने अल्झायमर होण्याचा धोका नाही, असं आम्हाला वाटतं. बालकथा, लघुकथा, ग्राफिटी वगैरेही मी सतत लिहिते. कुटुंबीयांसह निरनिराळ्या ठिकाणी पर्यटनाला जाते, तेव्हा मी सजगपणे त्या-त्या ठिकाणच्या बोलीभाषा ऐकत असते. स्वयंपाकाचीही खूप आवड आहे. त्यातही फक्त रवा, बटाटा, मूगडाळ असा एखादा घटक मनात पक्का करून त्याचेच वेगवेगळे पदार्थ बनवणं असा बेत करते. यात चवदार खाणं-खिलवणं तर साधतंच, पण कल्पकतेलाही आव्हान मिळतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Joyful and enjoyable exercise