पुण्यातील रुग्णांच्या नातेवाइकांनी घेतला धसका 

योगीराज प्रभुणे - सकाळ वृत्तसेवा 
Friday, 4 September 2020

नातेवाइकांची रुग्णाला तेथून हटविण्याची इच्छा असेल, तर त्याला जबरदस्तीने ठेवणेही वैद्यकीयदृष्ट्या योग्य ठरत नाही. अशा वेळी ‘डिस्चार्ज अगेंस्ट मेडिकल ऍडव्हाईस’ (डामा) रुग्णाला सोडता येते.

पुणे - माझ्या मामाला दहा-पंधरा वर्षांपासून मधुमेह आहे. रक्तदाबाच्या विकाराचेही निदान चार-पाच वर्षांपूर्वी झालंय. त्यांना जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याचा धोका मी पत्करणार नाही... अशा शब्दात संदीप कुंभार यांनी भीती व्यक्त केली. 

पत्रकार पांडुरंग रायकर यांच्यावर जम्बो रुग्णालयात वेळेवर प्रभावी उपचार झाले नाहीत. त्यांना तातडीने रुग्णवाहिका मिळाली नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या घटनेमुळे ‘जम्बो'चा धसका रुग्णाच्या नातेवाइकांनी घेतल्याचे दिसते. कोरोनाचे निदान झाल्याने उपचारांसाठी ससून रुग्णालयात आलेल्या नातेवाइकांशी ‘सकाळ’ने संवाद साधला. त्या वेळी त्यांनी ही व्यथा मांडली. रायकर यांना मदत मिळावी, यासाठी पत्रकारांनी अधिकाऱ्यांना फोन केले. नेत्यांना फोन केले. आम्ही तर सामान्य माणसे. आमच्या रुग्णाची ‘जम्बो’मध्ये हॉस्पिटलमध्ये अशी अवस्था झाल्यास आम्ही कोणाला फोन करणार, कोणाची मदत घेणार असा, असा सवाल कुंभार यांनी केला.  ‘जम्बो’त दाखल असलेल्या रुग्णांना तेथून बाहेर काढण्याची धडपड नातेवाईक करत आहेत. पण, तेथून दुसरीकडे कुठे दाखल करणार, हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. ते ससून रुग्णालयात चौकशी करत आहेत. खासगी रुग्णालयातही त्यांनी चकरा मारल्या. पण, जागा नसल्याने  ते हतबल झाल्याचे पहायला मिळाले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत महापालिकेच्या आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी म्हणाले, की आमच्या रुग्णाला ‘जम्बो’तून सोडा. त्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची आमची तयारी आहे. पण, रुग्णालयात दाखल रुग्णाला महापालिका सोडणार कसे, हा प्रश्न निर्माण होतो. तसेच, नातेवाइकांची रुग्णाला तेथून हटविण्याची इच्छा असेल, तर त्याला जबरदस्तीने ठेवणेही वैद्यकीयदृष्ट्या योग्य ठरत नाही. अशा वेळी ‘डिस्चार्ज अगेंस्ट मेडिकल ऍडव्हाईस’ (डामा) रुग्णाला सोडता येते. पण, तो अधिकार रुग्णालयातील डॉक्‍टरांचा आहे. महापालिकेचा नाही. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘ससून’मधून रुग्ण हलविणार नाही 
ससून रुग्णालयातून १५० ते २०० रुग्ण ‘जम्बो’मध्ये बुधवारी स्थलांतरित करण्यात येणार होते. त्यासाठी १०८ आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या रुग्णवाहिकांचा वापर करण्यात येणार होता. मात्र, ही प्रक्रिया आता थांबविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jumbo Covid Center Relatives of the patients took the shock