पुण्यातील जम्बो कोविड सेंटर्स पुन्हा होणार सुरु; राजेश टोपेंची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rajesh tope

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या कोरोना बाधितांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

पुण्यातील जम्बो कोविड सेंटर्स पुन्हा होणार सुरु; राजेश टोपेंची माहिती

पुण्यातील जम्बो कोविड सेंटर्स पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या कोरोना बाधितांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितलं.

आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यात मेट्रो शहरांमध्ये कोरोनाची प्रकरणं वाढतंच आहेत. सध्या ज्या वेगानं कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय त्यासाठी आपल्याला आणखी तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे आपले जेवढे जंबो सेंटर्स होते त्या सर्वांना पुन्हा एकदा अॅक्टिवेट करायचं आहे. काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये आम्ही स्पष्ट सांगितल की, ज्या ठिकाणी डॉक्टर्सची आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज आहे तिथे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने भरती करायची आहे. 

जानेवारी महिन्यांत राज्यात दर दिवशी २,००० रुग्ण आढळत होते. त्यामुळे कोविड रुग्णालयांमध्ये रुग्ण नव्हते, त्यामुळे काही प्रमाणात वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कर्तव्यावरुन परत पाठवण्याच्या सूचना आपण दिल्या होत्या. मात्र, आता पुन्हा गरजेप्रमाणं त्यांना सेवेत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वाढत्या रुग्णसंख्येवर आपण लक्ष ठेवून आहोत, असंही यावेळी राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

पुण्यात दररोज तीन लाख चाचण्या, देशात सर्वाधिक

पुण्यात दहा लाख लोकसंख्येच्या तुलनेत दररोज तीन लाख लोकांच्या चाचण्या केल्या जात आहेत.  देशात एखाद्या शहराच्या तुलनेत पुण्यातील लसीकरणाची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर मुंबईत १० लाखांच्या तुलनेत २.६५ लाख चाचण्या होत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात दीड लाख प्रति दहा लाख चाचण्या केल्या जात आहेत. 

केंद्राच्या गाईडलाईनप्रमाणं पुन्हा निर्बंध लागू

केंद्र शासनाने गाईडलाईनमध्ये ज्या गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत. त्यानुसार, सर्व सामाजिक, धार्मिक स्थळांवरील गर्दीला पूर्णपणे बंदी घातली आहे. रेस्तराँ, लग्न समारंभ, थिएटर्स यांची मर्यादा पुन्हा पन्नास टक्क्यांवर आणली आहे. ऑफिसेसमध्येही ५० टक्के उपस्थिती राहणार आहे.

पुण्यात ४०० हून अधिक ऑक्सिजन बेड उपलब्ध

पुण्यात ४०० हून अधिक ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. ऑक्सिजनशिवाय २००च्यावर बेड उपलब्ध आहेत. आयसीयूसह व्हेंटिलेटर्स आणि व्हेंटिलेटर्सशिवाय ६० ते ७० बेड उपलब्ध आहेत, अशी माहिती यावेळी राजेश टोपे यांनी दिली. 
 

loading image
go to top