आधीच असंख्य अडचणी; पोर्टलवर माहिती भरण्यास कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा नकार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

शिक्षक करत असलेल्या दैंनदिन कामकाजा आढावा आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घ्यायचा ठरविला आहे. हा आढावा घेण्यासाठी परिषदेने एक स्वतंत्र पोर्टल विकसित केले असून त्यात दर आठवड्याला माहिती भरण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र अशाप्रकारे माहिती भरून अहवाल देण्यास महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने यास नकार दिला आहे.

पुणे - शिक्षक करत असलेल्या दैंनदिन कामकाजा आढावा आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घ्यायचा ठरविला आहे. हा आढावा घेण्यासाठी परिषदेने एक स्वतंत्र पोर्टल विकसित केले असून त्यात दर आठवड्याला माहिती भरण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र अशाप्रकारे माहिती भरून अहवाल देण्यास महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने यास नकार दिला आहे.

राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी साप्ताहिक अहवाल संबंधित पोर्टलवर सादर करावेत, असे आदेशच मागील आठवड्यात दिले आहेत. मात्र राज्यातील शिक्षक सध्या आधीच ऑनलाईन पद्धतीने शिकवणे, कोरोनासंदर्भात अत्यावश्यक परिस्थितीतील कामे करणे व ग्रामीण तसेच दुर्गम भागात इंटरनेट सुविधांचा अभाव यामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे शिक्षकांना अशा प्रकारे माहिती भरण्याची सक्ती करु नये. प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांच्या सूचनेनुसार शिक्षक आपापले शैक्षणिक, अध्यापनाचे कार्य करीत आहेत व त्याची माहिती संबंधित संस्था प्रमुखांना आहे. त्यामुळे परिषदेने सदर माहिती संबंधित प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांच्याकडून घ्यावी, अशी सूचना केली आहे. शिक्षक या पोर्टल वर माहिती भरणार नाहीत असे महासंघाने जाहीर केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत महासंघाचे समन्वयक प्रा मुकुंद आंधळकर म्हणाले,"शिक्षकांचे वेळापत्रक, अध्यापन व इतर शैक्षणिक कार्याचे नियोजन व नियंत्रण प्राचार्य किंवा मुख्याध्यापक करीत असतात. त्यामुळे त्यांनी अहवाल मागवणे उचित आहे. शिक्षकांनी वरिष्ठांशी परस्पर पत्रव्यवहार करणे, माहिती पुरवणे नियमाच्या विरोधात आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने असे नियमबाह्य कार्य करावयास शिक्षकांना सांगणे हे गंभीर आहे. अशा प्रकारे नियमबाह्य माहिती मागवण्यापेक्षा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने संशोधनाकडे व शिक्षकांच्या प्रशिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे."

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Junior college teachers already refuse information portal numerous difficulties