

कवठे येमाई, ता. २१ : विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांच्या परिसरात जंकफूडच्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश अन्न व औषध प्रशासनाने जारी केला असला; तरी शिरूर तालुक्यात या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचे बहुतांश ठिकाणी चित्र आहे. अनेक शाळांच्या परिसरात चटपटीत पदार्थ, शीतपेये, तळलेले पदार्थ व प्रतिबंधित प्लॅस्टिकच्या पॅकेटमधून खाद्यपदार्थांची सर्रास विक्री सुरू असून, शाळा व्यवस्थापनासह संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे.
शाळांच्या परिसरात अधिक प्रमाणात चरबी, साखर व मीठ असलेल्या प्रक्रिया केलेल्या व पॅकेट बंद खाद्यपदार्थांची विक्री, जाहिरात आणि मोफत वाटपावर अन्न व औषध प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. शाळेच्या परिसरासह शाळेपासून पन्नास मीटरच्या परिघात अशा पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश सर्व सरकारी, अनुदानित तसेच खासगी शाळांना लागू आहे. मात्र, शिरूर तालुक्यातील अनेक शाळांच्या प्रवेशद्वाराजवळच टपऱ्या, हातगाड्या आणि पथारी लावून जंकफूडची विक्री जोरात सुरू असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. त्यामुळे शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त होत आहे.
----------------
शाळा व्यवस्थापनाने
जबाबदारी घेण्याची गरज
शाळेच्या आवारात किंवा परिसरात नियमबाह्य खाद्यपदार्थांची विक्री होऊ नये, याची जबाबदारी शाळा प्रशासनावरही सोपविण्यात आली आहे. शाळांनी अन्नसुरक्षेबाबत आवश्यक सूचना फलक लावणे, खाद्यपदार्थ पुरवठादारांकडे आवश्यक परवाने आहेत की नाहीत याची खात्री करणे तसेच विद्यार्थ्यांना आरोग्यदायी आहाराबाबत जागरूक करणे अपेक्षित आहे.
---------------------------------------
‘एफडीए’, पोलिसांच्या
भूमिकेकडे लक्ष
शाळांच्या परिसरात बंदी असतानाही जंकफूडची विक्री सुरू असल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासणी करून संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. नियमभंग करणाऱ्यांवर सुधारणा नोटीस, परवाना जप्ती तसेच आवश्यकतेनुसार इतर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. मात्र, शिरूर तालुक्यात प्रत्यक्षात अशा प्रकारच्या तपासणी व कारवाई होत नसल्याने ‘आदेश निघाले; आता अंमलबजावणी कधी?’ असा सवाल पालकांकडून उपस्थित होत आहे. शाळा व्यवस्थापन, अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे शाळांच्या परिसराची तपासणी करून नियमबाह्य विक्रीला आळा घालावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जंकफूडच्या सेवनामुळे लहान वयातच अयोग्य आहाराची सवय लागण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे शाळेच्या परिसरात तसेच शाळेपासून पन्नास मीटर अंतरावर जंकफूड विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या आरोग्यास निश्चितच फायदा होईल.
-प्रदीप पडवळ, उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, सविंदणे (ता. शिरूर)
अन्न व औषध प्रशासन विभागाकडून आदेश प्राप्त झाले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेचे पत्र प्राप्त झाल्यानंतर शाळांना जंकफूडबाबतच्या नियमावली संदर्भात सूचना देण्यात येतील.
प्रीतम कोकणे, गटशिक्षणाधिकारी, शिरूर
शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात जंकफूडची विक्री किंवा मोफत वितरण तसेच त्याची जाहिरात करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे पालन व्हावे, यासाठी शाळा व्यवस्थापनाने घ्यावयाच्या खबरदारीबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातूनही कारवाई सुरू आहे.
-लक्ष्मीकांत सावळे, अन्न सुरक्षा अधिकारी,
अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.