

Political deadlock in Junnar Municipal Council as councillors boycott general meeting over administrative disputes
Sakal
जुन्नर : नगराध्यक्ष आणि नगरसेवकांमध्ये असलेल्या मतभेदांमुळे जुन्नर नगरपरिषदेच्या कारभाराचे तीन तेरा वाजल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे. गेल्या सहा महिन्याच्या काळात नगराध्यक्ष, सत्ताधारी नगरसेवक व विरोधक यांच्यातील वादांमुळे शहरातील नगरपरिषदेच्या कामकाजाचा फज्जा उडाला असून शहराच्या विकासासाठी निवडून दिलेल्या नगरसेवकांच्या कामकाजाच्या पद्धतीवरून शहरातील सुजान नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील रस्ते, पाणी, आरोग्य, वीज, कचरा, शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारणा करण्याऐवजी नगरसेवकांच्या आपापसातील वादामुळे शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.