मातीमोल बाजारभावामुळे उत्पादक संकटात

मातीमोल बाजारभावामुळे उत्पादक संकटात
Published on: 

नारायणगाव, ता. २६ : संकरित टोमॅटो व कोबीचे बाजारभाव घसरल्याने जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. दुष्काळी परिस्थितीत ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची बचत करून सिंचनाचे योग्य नियोजन करून उत्पादित केलेल्या शेतमालाला मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने दुष्काळात तेरावा महिना, अशी उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.

जुन्नर, आंबेगाव तालुक्याच्या मध्यभागातील मीना, कुकडी व घोड नदीच्या काठालगतच्या शेतजमिनीत शेतकऱ्यांनी विविध भाजीपाला पिके घेतली आहेत. सद्यस्थितीत मेथी, कोथिंबीर या भाज्यांना उच्चांकी बाजारभाव मिळत आहे. चाळीत साठवणूक केलेल्या कांद्यालाही बाजारभाव चांगला मिळत आहे. मात्र, मागील आठ दिवसांपासून आर्यमान, विरांग या जातीच्या संकरित टोमॅटोचे व कोबीचे बाजारभाव घसरले आहेत. यामुळे सद्यस्थितीत ज्या शेतकऱ्यांची टोमॅटोची तोडणी सुरू आहे, कोबीचे पीक काढणीस तयार झाले आहे, असे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सद्यस्थितीत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात संकरित (हायब्रीड ) टोमॅटो क्रेटला (वीस किलोग्रॅम) प्रतवारीनुसार ३० रुपये ते शंभर रुपयांच्या दरम्यान ( दीड रुपया ते पाच रुपये किलो) भाव मिळत आहे.
कोबीला प्रति किलोग्रॅम एक रुपया ते तीन रुपयांच्या दरम्यान मातीमोल भाव मिळत आहे. सध्याच्या बाजारभावात तोडणी मजुरी, वाहतूक व पॅकिंग खर्च सुद्धा वसूल होत नाही. यामुळे टोमॅटो उत्पादनासाठी एकरी सुमारे दीड लाख रुपयांचा तर कोबी उत्पादनासाठी एकरी सुमारे एक लाख रुपयांचा केलेला खर्च मातीत गेला आहे. शेतमाल उत्पादित करण्यासाठी आवश्यक असणारी कीटकनाशके, रासायनिक खते, मजुरी, ठिबक सिंचन मल्चिंग कागद आदींचे बाजारभाव दरवर्षी वाढत आहेत. मात्र शेतमालाचे बाजारभाव कमी होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील बोजा वाढत आहे, अशी भावना शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे.

गावठी टोमॅटोला पसंती :
हायब्रीड टोमॅटोच्या तुलनेत दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, आसाम या राज्यातील हॉटेल व्यावसायिक व ग्राहकांकडून चवीला आंबट असलेल्या व साल पातळ असलेल्या गावठी टोमॅटोला मागणी वाढली आहे. यामुळे नारायणगाव टोमॅटो उपबाजारात सोमवारी (ता. २६) झालेल्या लिलावात गावठी (साहू) टोमॅटो क्रेटला शंभर रुपये ते साडेतीनशे रुपयांच्या दरम्यान समाधानकारक भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे संचालक सारंग घोलप, व्यापारी योगेश घोलप यांनी दिली.

ऑगस्ट महिन्यात एक एकर क्षेत्रात बत्तीस हजार कोबीच्या रोपांची लागवड केली होती. सुमारे एक लाख रुपये भांडवली खर्च झाला होता. सध्या कोबीला प्रति किलोग्रॅम एक ते तीन रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. या बाजारभावात कोबी विक्रीसाठी पाठवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने कोबी आज मेंढपाळाला मोफत मेंढ्या चारण्यासाठी दिला आहे.
- रवींद्र शिंगोटे, कोबी उत्पादक, खामुंडी, ता. जुन्नर

नारायणगाव उपबाजारात आर्यमान या संकरित जातीचे तीनशे क्रेट टोमॅटो विक्रीसाठी आणले होते. तोडणी मजुरी, वाहतूक खर्च आदींसाठी प्रतिक्रेट ७० रुपये खर्च झाला. तेवढाच बाजार मिळाल्याने निराशा झाली.
- प्रमोद कानडे, टोमॅटो उत्पादक, कळंब, ता. आंबेगाव.


08799

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com