

Garbage dumped along the service road near Khole Vasti in Kadamwakvasti.
esakal
लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील खोले वस्ती परिसरातील सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) सध्या कचऱ्याच्या विळख्यात सापडला आहे. या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, रस्त्यावर पसरलेल्या कचऱ्यामुळे दुचाकी घसरून होणाऱ्या अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू, चिकुनगुनिया आणि मलेरियासारख्या जीवघेण्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.