
शिक्रापूर : साडेसातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या संजीवन समाधीसमयी ज्यांना खिरापतीचे कीर्तनासाठी निमंत्रित केले होते, त्या केंदूर (ता. शिरूर) येथील संत कान्हुराज पाठक महाराजांच्या पंढरपूर पालखी सोहळ्याचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. दोन्ही संतांमधील संबंध असे होते की, माऊली पाठक महाराजांना काका म्हणत. दोन्ही संतांचे पंढरपुरी जाताना पालखी मार्ग वेगवेगळे असल्याने त्यांचा सामना लोणंद (जि. सातारा) येथे दरवर्षी औपचारिकता म्हणून होत होता. हाच सोहळा आता अधिकृतपणे ‘काका-पुतण्या भेट सोहळा’ म्हणून यावर्षीपासून निश्चित झाल्याची माहिती कान्हुराज महाराजांचे १६ वे वंशज कीर्तनकार सारंग महाराज राजपाठक, दिंडी सोहळा विश्वस्त रंगनाथ थिटे गुरुजी यांनी दिली.