ढेबेवाडी काळगाव कुंभारगावात  नाराजी नाट्याची भिती

ढेबेवाडी काळगाव कुंभारगावात नाराजी नाट्याची भिती

Published on

काळगाव- कुंभारगावात नाराजी नाट्याची भीती?

खुल्या आरक्षणामुळे इच्छुकांची संख्या वाढल्याने नेतेमंडळींसमोर आव्हान; लढती होणार चुरशीच्या

राजेश पाटील : सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी, ता. २० : पाटण तालुक्यासह जिल्हा, राज्य आणि देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेला कुंभारगाव विभाग ज्यामध्ये समाविष्ट आहे त्या काळगाव जिल्हा परिषद गटावर झेंडा फडकविण्यासाठी भाजप आणि शिवसेना जिवाचे रान करणार आहे. जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण महिला, तर त्याअंतर्गत काळगाव व कुंभारगाव या दोन्ही गणांत सर्वसाधारण पुरुष आरक्षण आल्याने इच्छुकांची गर्दी कधी नव्हे एवढी वाढली आहे, त्यातून नाराजी नाट्य घडण्याचीही शक्यता असल्याने ऐनवेळी ती रोखण्याचे मोठे आव्हान नेते मंडळींसमोर असणार आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांना विधानसभेला मोठे मताधिक्य देणारा विभाग म्हणून काळगाव- कुंभारगाव विभागाची ओळख आहे. येथील काही मंडळींनी राज्यात आणि केंद्रातही प्रतिनिधित्व केले आहे. माजी केंद्रीय मंत्री (कै.) आनंदराव चव्हाण, माजी खासदार (कै.) प्रेमलाताई चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कुंभारगाव हे मूळगाव आहे. विविध पक्षांचे आणि गटांचे पदाधिकारी व कार्यकर्ते येथे सक्रिय असून, निवडणूक ग्रामपंचायतीची असो की विधानसभा- लोकसभेची या मतदारसंघाची चर्चा झाली नाही, असे सहसा कधी होत नाही.
देसाई यांच्या गटातून सुनीता चाळके यांचे नाव समोर आले आहे. शिवसेनेचे निष्ठावंत म्हणून तानाजी चाळके यांची ओळख असून, त्यांचा लोकसंपर्क या परिसरात आहे. भाजपमधून राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे संचालक भरत पाटील यांच्या पत्नी प्राजक्ता पाटील यांच्या, तसेच पक्षाच्या जुन्या आणि तळमळीच्या कार्यकर्त्या, बचत गट, महिला सक्षमीकरण, दारूबंदीसह अनेक लढ्याचे नेतृत्व केलेल्या कविता सतीश कचरे यांच्या नावाची शेवटपर्यंत चर्चा आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून नेतेमंडळीकडे आपापल्या परीने फिल्डिंग लावली असली, तरी ऐन वेळी उमेदवारी न मिळाल्यास उमेदवारीच्या प्रश्नांवर नाराजी वाढण्याची चिन्हे आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात अशी नाराजी नेते मंडळी आणि पक्षांसाठी धोकादायक ठरण्याची भीती असल्याने बंड करण्याआधीच त्यांना थंड करण्याचे मोठे आव्हान नेत्यांपुढे असणार आहे.

चौकट

पंचायत समितीसाठी मोठी रस्सीखेच
काळगाव पंचायत समिती गणात भाजपमधून अनिल डाकवे आणि माजी पंचायत समिती सदस्य नानासाहेब सावंत यांचे, तर शिवसेनेतून माजी पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई, अधिकराव देसाई आणि जनसहकार समूहाचे संस्थापक मारुतीराव मोळावडे यांचे नाव अखेरपर्यंत चर्चेत होते. कुंभारगाव गणात पाटण पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश मोरे आणि भारतीय जनता पक्षाचे दक्षिण मंडल अध्यक्ष गणेश यादव यांचे नाव चर्चेत आहे. याच गणात शिवसेनेतून उद्योजक सचिन यादव, उद्योजक संदीप टोळे यांची नावे चर्चेत होती. श्री. यादव यांचे नाव पुढे आल्याचे समजते.

चौकट

पृथ्वीराज चव्हाण व देसाईंची भूमिकाही महत्त्वाची
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी शिक्षण समिती संजय देसाई आदी नेतेमंडळींचे नेतृत्व मानणारा कार्यकर्त्यांचा गटही काळगाव- कुंभारगाव भागात असल्याने त्यांची भूमिका काय राहणार? हेही महत्त्वाचे आहे. काही वेळा अगदी काठावरही निकाल देण्याची कुंभारगाव - काळगाव विभागाचा इतिहास असल्याने उमेदवार आणि त्यांच्या नेतेमंडळींना निवडणूक काळात डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवावी लागणार आहे.

----------------------------------------------

(फोटो)
१) पृथ्वीराज चव्हाण
२) शंभूराज देसाई
३) सत्यजितसिंह पाटणकर
४) भरत पाटील
५) संजय देसाई

--+++----++++-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com