-

-
Published on

जिद्द, चिकाटीतून केली एकात्मिक शेती यशस्वी
वयाच्या ५४ व्या वर्षानंतर शेतीत घडवलेले करिअर

उत्तराखंड राज्यातील ग्विन छोटा गावातील कमल सिंह उनियाल यांनी वयाच्या ५४ व्या वर्षानंतर शेतीतील करिअरला सुरूवात केली. कृषी विभाग व संस्थांमधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. त्यातून दुग्धव्यवसाय, भाजीपाला, मत्स्यपालन व अळिंबी अशी एकात्मिक शेती विकसित केली. त्यातून अर्थकारण उंचावले. शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत तयार झाला. कार्याची दखल घेऊन विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानितही करण्यात आले. जिद्द, चिकाटी, ज्ञान घेण्याची वृत्ती हे गुण अंगीकारल्यास
आयुष्याच्या कोणत्याही वळणावर यशस्वी होता येते हे कमल सिंह यांनी कृतीतून सिद्ध केले आहे.
.......................................................................
एखादे संकट म्हणजे ती समस्या नसते. तर एका नवीन प्रवासाची सुरुवात किंवा संधी देखील असते. उत्तराखंड राज्यात पौरी गढवाल जिल्ह्यात ग्विन छोटा (Gvin Chhota) नावाचे गाव वसले आहे. येथील प्रगतशील शेतकरी कमल सिंह उनियाल हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. पूर्वी ते पारंपरिक शेती पध्दतीचे जीवन व्यतीत करायचे. मात्र दृढ निश्चय, सातत्याने नवे काही शिकण्याची वृत्ती आणि तंत्रज्ञान उपलब्ध करणाऱ्या संस्थांचे पाठबळ किंवा मार्गदर्शन यांच्या जोरावर त्यांनी आपल्या आयुष्यात बदल घडवून आणला आहे. एकात्मिक शेतीद्वारे (integrated farming) प्रगती साधली आहे. आज अनेकांसाठी ते प्रेरणास्थान बनले आहेत.

शेतीचा नवा अनुभव

सुमारे ५४ वर्षे वयाचे कमल सिंह यांचा शेतीतील प्रवास अजिबात सोपा नव्हता. नवी दिल्ली येथील एका बल्ब निर्मिती कारखान्यात त्यांनी नोकरी केली. त्यानंतरही उज्ज्वल भविष्याच्या शोधात अनेक छोटे-मोठे व्यवसाय करून पाहिले. मात्र वारंवार आलेल्या अपयशांमुळे ते निराश झाले. तरीही हार न मानता व चिकाटी न सोडता शेतीतच करिअर घडवण्याचा निर्धार करून ते आपल्या मूळ गावी परतले. शेती क्षेत्र कमल सिंह यांच्यासाठी पूर्णपणे नवे होते. त्यातील अनुभव काहीच नव्हता. मात्र त्यात यशस्वी होण्याची जिद्द होती. त्यातूनच त्यांनी मार्गदर्शनासाठी कृषी विभागाशी संपर्क साधला. त्यांचा उत्साह आणि शिकण्याची तयारी कृषी विभागाला प्रभावित करून गेली. त्यातूनच २०१५-१६ मध्ये पंतनगर येथील राज्य कृषी व्यवस्थापन आणि विस्तार संस्थेच्या (सामेती) प्रशिक्षणासाठी त्यांची निवड करण्यात आली. हे प्रशिक्षण कमल सिंह यांच्यासाठी महत्त्वपूर्ण वळण ठरले. शास्त्रीय आणि व्यावहारिक ज्ञान व कौशल्ये त्यांना येथे आत्मसात करता आली. त्यातूनच कृषी प्रवासाचा पाया भक्कम होण्यास मदत झाली.

दुग्धव्यवसायाचा अंगीकार

कमल सिंह यांच्या शेतात भात आणि गहू यासारखी पारंपरिक पिके घेतली जात. परंतु त्यातून मिळणारे मर्यादित उत्पन्न पाहून त्यांनी शेतीत विविधता आणण्याचा निर्णय घेतला. दुग्धव्यवसाय ही एक आश्‍वासक संधी असल्याचे ओळखले. स्थानिक पशुवैद्यकीय विभागाची मदत घेतली. त्याचबरोबर तंत्रज्ञान संस्थेच्या मार्गदर्शनातून साहिवाल जातीच्या चार गाई खरेदी केल्या.
कष्ट करण्याची तयारी, उत्कृष्ट व्यवस्थापनातून दुग्ध व्यवसाय फायद्यात आणण्यात कमल सिंह यांना यश मिळाले. व्यवसायाचा अधिक विस्तार करण्याचा आत्मविश्वास मिळाला. आज दुग्धव्यवसायात जम बसवताना दोन साहिवाल गाई, प्रत्येकी एक सिंधी, बद्री, जर्सी गाय आणि एक पहाडी म्हैस असे पशुधन त्यांच्याकडे आहे. प्रति दिन २० ते २५ लिटर दूध संकलन होते. दुधातून ताजा पैसा मिळू लागल्याने कौटुंबिक आर्थिक स्थिती बळकट झाली आहे. त्यातूनच एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.

एकात्मिक शेतीला चालना

अलीकडील वर्षांत बिगर हंगामी भाजीपाला लागवड, मत्स्यपालन आणि अळिंबी (मशरूम) अशी शेतीला जोड देत कमल सिंह यांनी व्यवसायाचा विस्तार केला आहे. तलावांमध्ये ग्रास कार्प, सिल्व्हर कार्प आणि पँगासियस या माशांचे संगोपन केले जाते, तर धिंगरी अळिंबीने त्यांच्यासाठी नफ्याचा अतिरिक्त स्रोत निर्माण केला आहे. या एकात्मिक शेती पद्धतीमुळे उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करणे, उत्पादनातील जोखीम कमी करणे आणि वर्षभर उत्पन्नाचा स्रोत
तयार करणे शक्य झाले आहे. प्रत्यक्ष कृतीवर आधारित तांत्रिक प्रशिक्षणाचा कमल सिंह यांना फायदा झालाच. त्याव्यतिरिक्त सामेटी-उत्तराखंड या व्हॉट्स ॲप ग्रूपमध्ये ते सहभागी झाले. तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी, शेतावरील आव्हानांचे निराकरण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या मालाला, उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हा प्रभावी विस्तार मंच ठरला. ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे दुर्गम भागातील शेतकरीही शेती क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान आणि नव्या प्रयोगांशी जोडले गेले.

पुरस्कारांनी गौरव, प्रेरणास्त्रोतही

कमल सिंह यांची चिकाटी, निष्ठा, प्रयत्न आणि त्यातून विकसित केलेली शेती यांची सरकारी पातळीवर दखल घेण्यात आली. सन २०१७ मध्ये त्यांना आत्माकडून प्रतिष्ठित किसान श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर पौडी येथील पशुवैद्यकीय विभागाकडूनही सर्वोत्कृष्ट शेतकरी म्हणून गौरविण्यात आले. भाजीपाला उत्पादनातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना पुन्हा एकदा किसान श्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. पशुपालनातील त्यांचे उल्लेखनीय कार्य लक्षात घेता पशुवैद्यकीय विभागाने त्यांना पहाडी जातीच्या ११ शेळ्याही उपलब्ध करून दिल्या. त्यातून एकात्मिक शेती पद्धती अधिक बळकट झाली. कमल सिंह यांची एकेकाळची स्थिती पाहता वयाच्या ५४ व्या वर्षानंतर त्यांच्या जीवनात झालेले परिवर्तन उल्लेखनीय म्हणावे लागेल. सन २०१७ च्या सुमारास वार्षिक ७२ हजारांच्या दरम्यान ते उत्पन्न मिळवायचे. आता शेतीतील विविध उपक्रमांतून तिपटीहून अधिक निव्वळ वार्षिक उत्पन्न मिळवण्यापर्यंत त्यांनी मजल गाठली आहे.
कमलसिंग आज केवळ यशस्वी शेतकरी नसून ग्रामीण तरुणांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरक झाले आहेत. शेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन त्यांनी युवकांना दिला आहे. शेती हा शाश्वत उपजीविकेचा स्रोत आहेच. शिवाय ग्रामीण भागातून शहरांकडे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी शेती हाच प्रमुख पर्याय असल्याचे ते सांगतात.

(स्रोत: राज्य कृषी व्यवस्थापन आणि विस्तार प्रशिक्षण संस्था, उत्तराखंड, जी.बी. पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, पंतनगर)

Marathi News Esakal
www.esakal.com