वराळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी जीव मुठीत धरून प्रवास

विजय सुराणा
शुक्रवार, 16 जून 2017

कामशेत - पूल नसल्याने गेल्या तीन पिढ्यांपासून मावळ तालुक्‍यातील नाणोली आणि वराळे गावांतील शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून इंद्रायणीच्या नदीपात्रातून निकामी झालेल्या होडीतून प्रवास करावा लागतो. गेल्या महिन्यातच या होडीत पाणी शिरल्याने ती बुडाली होती. शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी होडीतून प्रवास करून शाळा गाठली.  

कामशेत - पूल नसल्याने गेल्या तीन पिढ्यांपासून मावळ तालुक्‍यातील नाणोली आणि वराळे गावांतील शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून इंद्रायणीच्या नदीपात्रातून निकामी झालेल्या होडीतून प्रवास करावा लागतो. गेल्या महिन्यातच या होडीत पाणी शिरल्याने ती बुडाली होती. शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी होडीतून प्रवास करून शाळा गाठली.  

इंद्रायणीच्या अलीकडे-पलीकडे जाण्यासाठी होडी म्हणजे या दोन गावांना जोडणारी दुवा आहे. नाणोली गावची लोकसंख्या बाराशेवर आहे. वराळे व तळेगावला जाण्यासाठी त्यांना जवळचा मार्ग म्हणून होडीचा प्रवास करावा लागतो. येथील मुले-मुली वराळे व इतर गावांतील शाळेत जाण्यासाठी होडीचा वापर करतात. सध्या असलेल्या होडीची अवस्था बिकट झाली आहे. तळाला छिद्रे पडली आहेत. त्यामुळे होडीत पाणी येते. ते बाहेर फेकण्यासाठी एक डबा ठेवला आहे. येथील शेतकऱ्यांच्या जमिनी नाणोली, चाकण येथे असल्याने त्यांना सतत प्रवास करावा लागतो.

मानधनाशिवाय नावाड्याची तिसरी पिढी
गावकऱ्यांनी दिलेल्या बलुत्यावर तीन पिढ्यांपासून नावड्याचे कुटुंबीय उदरनिर्वाह करीत आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना झाडाच्या खोडाला तारा बांधल्या आहेत. त्या तारेच्या आधारे होडी ओढून नाव पुढे नेली जाते. सुरवातीला दत्तोबा गव्हाणे यांनी होडी चालवली. नंतर मुलगा बळीराम आणि सून बिबाबाई याही याच व्यवसायात गुंतल्या आहेत. गेल्या तीन पिढ्यांपासून हे कुटुंब ही सेवा करत असून, या मोबदल्यात पैसे न घेता धान्य घेतात. ग्रामस्थांची व शालेय विद्यार्थ्यांची सेवा आमच्या हातून घडते हे आमचे भाग्य आहे. परंतु, सध्या महागाईचे दिवस आहेत. त्यामुळे सरकारकडून अथवा दोन्ही ग्रामपंचायतींनी मानधन द्यावे, अशी मागणी बिबाबाई गव्हाणे यांनी केली.

सरकारला जाग कधी येणार
वराळे-नाणोली येथील इंद्रायणी नदीवर पूल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी ५० वर्षांपूर्वी केली होती. १९८५ मध्ये तत्कालीन मंत्री मदन बाफना यांनी भूमिपूजनही केले होते. परंतु, अद्याप पूल झाला नाही. माजी सभापती धोंडिबा मराठे, माउली मराठे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, प्रवीण मराठे, नाणोलीचे सरपंच विशाल लोंढे यांनी सांगितले, की पूल होणे गरजेचे आहे. सध्याची होडी निकामी झाली आहे. मध्यंतरी तिची दुरुस्ती करण्यात आली. पूल होईपर्यंत सरकारने नवीन होडी देण्याची गरज आहे.

Web Title: kamshet pune news school student dangerous journey for education