कानकात्रे व वडाचामळ्यात विद्यार्थ्यांविना शाळा

कानकात्रे व वडाचामळ्यात विद्यार्थ्यांविना शाळा
Published on

कानकात्रे, वडाचामळ्यात विद्यार्थ्यांविना शाळा

प्रशासन निर्णयावर ठाम; पट कमी असल्याने शिक्षकांचे समायोजन

मायणी, ता. २२ : खटाव तालुक्यातील कानकात्रे व वडाचामळा येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या दोन प्राथमिक शाळा आहे. तेथील विद्यार्थ्यांचा पट कमी असल्यामुळे शिक्षक इतर शाळेत समायोजित केल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करीत पालकांनी मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
या शाळेत गेल्या १५ ऑगस्टपासून विद्यार्थी हजर झाले नाहीत, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने ज्या शाळेत १५ पेक्षा कमी पट आहे आणि त्या शाळेत दोन शिक्षक असतील, तर त्या शिक्षकांचे समायोजन निर्णय घेतल्याने शिक्षण विभाग निर्णयावर ठाम आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, कानकात्रे व वडाचामळा येथील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या प्राथमिक शाळेत प्रत्येकी दोन शिक्षकांची जिल्हा परिषदेमार्फत नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, त्यापैकी एका शिक्षकाची तालुका पातळीवर समायोजन केल्याने ते इतर शाळेत हजर झाले आहेत. त्यामुळे कानकात्रे व वडाचामळा शाळेत एकच शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत. त्यामुळे अध्यापनावर परिणाम होत असल्याचे पत्र पालक व ग्रामपंचायतीने खटाव गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे. आमच्या गावच्या शाळेत त्या शिक्षकांचे पगार निघत असून, ते शिक्षक इतरत्र काम करीत आहेत. त्यांना आमच्या गावच्या शाळेत हजर करा, असेही पत्रात नमूद केले आहे.

---------------------------

कोट
शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षक मिळणार नाहीत, तोपर्यंत आम्ही मुले शाळेत पाठविणार नाही.

- किशोर पवार व कैलास जगदाळे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती

-------------------------

कोट

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने ज्या शाळेत १५ पेक्षा कमी पट आहे आणि त्या शाळेत दोन शिक्षक असतील, तर त्या शिक्षकांचे समायोजन निर्णय घेतला आहे. हा निर्णय जिल्ह्याभर आहे. त्यामुळे तेथील शिक्षकांचे इतरत्र समायोजन झाले आहे.

- अनिस नायकवडी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

--------------------------------

Marathi News Esakal
www.esakal.com