

फळबाग विम्यापासून करंजीसह १८ गावे वंचित
डाळिंबाचे दीड हजार हेक्टर क्षेत्र : कृषीसह महसूल विभागावर नाराजी
करंजी, ता. १ : करंजी परिसरात डाळिंबाचे तब्बल १ हजार ३८४ हेक्टर क्षेत्र असतानाही हवामान आधारित फळबाग विम्याचा एकाही शेतकऱ्याला लाभ मिळालेला नाही. दुसरीकडे तिसगाव-मिरी परिसरातील डाळिंब उत्पादकांना हेक्टरी किमान ८० हजार रुपयांप्रमाणे विम्याची रक्कम मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे करंजीसह परिसरातील १८ गावांतील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
करंजी परिसरात डाळिंब, संत्रा, मोसंबीच्या मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत. सध्या दुष्काळी परिस्थिती असतानाही या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळालेला नाही. विमा कंपनीने लाभ नाकारण्यामागे दिलेली कारणेही शेतकऱ्यांना पटणारी नसल्याचे सांगण्यात येत आहे. मिरी आणि करंजी परिसरातील हवामानात नेमका असा कोणता फरक आहे की एका भागातील शेतकऱ्यांना विमा मिळतो आणि दुसऱ्या भागातील शेतकरी वंचित राहतात, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.
करंजी, भोसे, दगडवाडी, सातवड, वैजूबाभळगाव, घाटशिरस, देवराई, आठरेकोडगाव, खांडगाव, लोहसर, त्रिभुवनवाडी, कानोबावाडी, खंडोबावाडी, चिंचोंडी-शिराळ, धारवाडी, गीतेवाडी आणि डोंगरवाडी आदी गावांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती आहे.
विमा कंपनीचा मनमानी कारभार तसेच कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून विमा नाकारण्याची कारणे स्पष्ट करावीत आणि संबंधित अधिकाऱ्यांची वरिष्ठांकडे तक्रार करावी, अशी मागणी शशिकांत क्षेत्रे, सोन्याबापू दानवे, राजेंद्र मरकड, गोपीनाथ अकोलकर आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
----------
करंजी परिसरातील शेतकऱ्यांना या विम्याचा लाभ मिळालेला नाही. त्या अनुषंगाने संबंधित विमा कंपनीकडे रीतसर पत्र व्यवहार करून अहवाल मागवला आहे.अहवालातील मुद्दे पाहून पुढील कारवाई केली जाईल.
- महादेव लोंढे, तालुका कृषी अधिकारी, पाथर्डी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.