कऱ्हाड नागरी वस्तीत रात्री पडणारा कचरा पालिकेची डोकेदुखी

कऱ्हाड नागरी वस्तीत रात्री पडणारा कचरा पालिकेची डोकेदुखी
Published on: 

कऱ्हाडला नागरी वस्तीत रात्रीत पडतोय कचरा

पालिकेसह आरोग्य विभागाकडून कारवाईची गरज; अंधारात काही व्यापाऱ्यांचे कृत्य

कऱ्हाड, ता. १९ ः पहाटेच्या कोवळ्या उन्हात शाळेला जाणारी चिमुकली मुले, मॉर्निंग वॉकला निघालेले ज्येष्ठ नागरिक आणि कामावर धावणारे चाकरमानी... सर्वांच्याच वाटेवर सकाळी स्वागत करते ती दुर्गंधी आणि विखुरलेल्या कचऱ्याची ढिगारे. काही व्यावसायिक दुकाने बंद केल्यानंतर रात्रीच्या अंधारात चोरपावलांनी येऊन सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतात आणि सकाळी पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर अनावश्यक ताण येतो. त्या ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज आहे.
शहर परिसरातील व्यावसायिकांसह काहींचा शहरातील ठराविक ठिकाणी पडणारा कचरा शहराच्या स्वच्छतेला ग्रहण ठरतो आहे. दहापेक्षाही अधिक सार्वजनिक ठिकाणांचा समावेश आहे. रात्री संबंधित ठिकाणी कचरा टाकला जातो. पालिकेला वेळ मिळेल तेव्हा तो उचलला जातो. त्यामुळे कचरा उचलण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाला स्वतंत्र मनुष्यबळ वापरावे लागते. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत शहरातील विविध ठिकाणची कचरा कोंडाळी पालिकेने हटविली. मात्र, अद्यापही काही ठिकाणी कचरा पडत आहे. तो कचरा हटवण्यासाठी योग्य उपायांची गरज आहे.
मध्यंतरी जागीच दंडात्मक कारवाई पालिकेने केली. मात्र, त्याचा सध्या विसर पडला आहे. तो कचरा हटविण्यासाठी मध्यंतरी सीसीटीव्हीचा वापर केला. त्यामुळे अनेक ठिकाणचा कचरा गायब झाला. मात्र, प्रत्येक ठिकाणी ते करणे शक्य होत नसल्याचे वास्तवही आहे. त्यामुळे पालिकेने कचरा पडणाऱ्या बहुतांशी नागरी वस्तीशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर किमान एक कर्मचारी सायंकाळनंतर गस्तीसाठी ठेवल्यास या सगळ्याच ठिकाणी पडणाऱ्या कचऱ्यावर नियंत्रण येणे शक्य आहे. त्या कर्मचाऱ्याला कचरा टाकताना कोणी दिसल्यास थेट कारवाई अपेक्षित आहे. त्यासोबतच स्पॉट फाइन करण्याचे अधिकार दिल्यास ती ठोस कार्यवाही प्रभावी ठरेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
-----------------------
येथे पडतोय कचरा

- कोयनेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता
- बुधवार पेठेत प्रभात चित्रपटगृहासमोर
- यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनाच्या मागील बाजूस
- बस स्थानकाबाहेर भू-विकास बँक इमारतीसमोर
- दत्त चौकातील सूर्या कॉम्प्लेक्सच्या उजव्या बाजूचा कोपरा
- बसस्थानकाबाहेर ईदगाह मैदानाकडे जाणारा रस्ता
- भाजी मंडई परिसरात पालिका इमारतीसमोर
- हद्दवाढ भागातील कचरा डेपोकडे जाणारा रस्ता
- कमळेश्वर मंदिरासमोरून नदीकडे जाणारा रस्ता
- कृष्णा घाटावरील नदीकाठावरील परिसर
- जुन्या कोयना पुलाखालील भाग नव्या कृष्णा नदीच्या पुलाखाली

येथील हटला कचरा

- शुक्रवार पेठेत तीन ठिकाणे
- कन्याशाळाशेजारील कचरा
- भाजी मंडई परिसरातील ठिकाण
- मंगळवार पेठ परिसर
- मुख्य रस्त्यावरील कोंडाळी
- आझाद चौकातून पाण्याच्या टाकीकडे जाणारा रस्ता
- यशवंत हायस्कूलशेजारून नदीकडे जाणारा रस्ता
------------------------
66760
कऱ्हाड ः शहराच्या नागरी वस्तीत पडलेला कचरा.
----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.