

कऱ्हाडमध्ये दोन हॉटेलवर कारवाई
तीन हॉटेल मालकांवर दंडाच्या हालचाली; अन्न व औषध प्रशासन विभागाची तपासणी मोहीम
कऱ्हाड, ता. ५ ः अन्न व औषध प्रशासन आयुक्त मुंढे यांनी सुरू केलेल्या ऑनलाइन तक्रार निवारण पोर्टलवर शहरातील काही हॉटेलबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातील विविध हॉटेलची तपासणी मोहीम राबविली. या कारवाईत दोन हॉटेलमध्ये मुदतबाह्य थंड पेयाची विक्री व अन्य काही संशयास्पद खाद्यपदार्थ आढळून आल्याने संबंधित हॉटेल पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्य तीन हॉटेलवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे यांनी दिली.
ऑनलाइन पोर्टलवर नागरिकांनी अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीसंदर्भात केलेल्या तक्रारींची पडताळणी करण्यासाठी ही विशेष तपासणी करण्यात आली. सहाय्यक आयुक्त शिंगाडे, अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रूपनवर यांनी तपासणी केली. तपासणीदरम्यान काही ठिकाणी अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक स्वरूपात निदर्शनास आले. काही खाद्यपदार्थ संशयास्पद आढळल्याने त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तपासणी अहवाल आणि प्रयोगशाळेच्या निष्कर्षानुसार संबंधित हॉटेलांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अन्न व्यावसायिकांनी स्वच्छता, खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही सुरू राहतील, असा इशाराही अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या या धडक कारवाईमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
......................
तासवडे एआयडीसीत गूळ सील
--------
तासवडे औद्योगिक वसाहतीत पॅकिंगवर माहिती न देताच गुळाचे पॅकिंग करून तो अन्यत्र पाठवण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे आज सहाय्यक आयुक्त शिंगाडे व त्यांच्या पथकाने तेथे तपासणी केली. तेथे सुमारे तीन लाखांचा गूळ सील करण्यात आल्याचे श्री. शिंगाडे यांनी सांगितले.
......................
नागरिकांनी तक्रारीसाठी पुढे यावे
नागरिकांच्या अन्नपदार्थांविषयी ज्या तक्रारी असतील, त्या त्यांनी ऑनलाइन पोर्टलवर नोंदवाव्या. त्यांची नावे गोपनीय ठेवून खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल व अन्य आस्थापना यांची तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल. तक्रारी देण्यासाठी नागरिकांनी बिनधास्तपणे पुढे यावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.