करमाळ्यात आमदार नारायण पाटील विरूध्द माजी आमदार शिंदे गट - माजी आमदार जगताप गट व बागल गट अशी लढत

करमाळ्यात आमदार नारायण पाटील विरूध्द माजी आमदार शिंदे गट - माजी आमदार जगताप गट व बागल गट अशी लढत

Published on

फोटो ओळी
आमदार नारायण पाटील
माजी आमदार जयवंतराव जगताप
माजी आमदार संजयमामा शिंदे
रश्मी बागल

करमाळा तालुका

नारायण पाटलांविरुद्ध शिंदे, जगताप, बागल रंगतोय सामना

काही गटांत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षानेही दिले उमेदवार


करमाळा, ता. ३ : करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांची करमाळा तालुका विकास आघाडी विरुद्ध भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस युती (माजी आमदार संजयमामा शिंदे गट व बागल गट) यांना माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पाठिंबा दिला आहे. त्याशिवाय शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून काही उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
सद्य परिस्थितीत मोहिते पाटील आणि आमदार नारायण पाटील यांचे देखील दुरावा निर्माण झाल्याची स्थिती आहे. करमाळ्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची ही निवडणूक कोणाला निवडून आणायचे आणि कोणाला पाडायचे याच मुद्द्यावरती येऊन पोचली आहे.
आमदार नारायण पाटील हे जाहीर सभा बैठका घेत आहेत तर त्यांच्या विरोधात माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, रश्मी बागल, दिग्विजय बागल हे काही ठिकाणी स्वतंत्र तर काही ठिकाणी एकत्र सभा, बैठका घेत आहेत. आमदार पाटील यांचे चिरंजीव सरपंच पृथ्वीराज पाटीलही स्वतंत्र प्रचार दौरे करत आहेत. सहा जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गणासाठी ही निवडणूक होत असून नेमका गुलाल कोणाच्या अंगावर पडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. आमदार नारायण पाटील यांच्या विरोधात एक तगडे आव्हान उभा करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला आहे. तर विरोधकांचे आव्हान स्वीकारून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन निवडणुकीला समर्थपणे सामोरे जाण्याचा निर्णय आमदार पाटील यांनी घेतला आहे.
ही निवडणूक खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप हे एकत्र निवड लढवणार होते. मात्र जागावाटप होऊ शकले नाही. यातून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी ही निवडणूक पक्षावर लढवण्याचा निर्णय घेतला तर आमदार नारायण पाटील यांनी आघाडी करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तर माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.
मागील दोन दिवसांपूर्वी बार्शीची माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत माजी आमदार जयवंतराव जगताप, रश्मी बागल यांची बैठक होऊन जयवंतराव जगताप यांनी रश्मी बागल व माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या युतीला पाठिंबा जाहीर केला आहे.
त्यामुळे या निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांची करमाळा तालुका विकास आघाडी विरुद्ध माजी आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार जयवंत जगताप, भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पक्षाकडून काही ठिकाणी स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत.


केम गणाच्या लढतीकडे लक्ष
कोर्टी जिल्हा परिषद गटातील मोहिते पाटील समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्या सविताराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भरलेला आपला उमेदवारी अर्ज मागे घेत त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले बारामती ॲग्रोचे सुभाष गुळवे यांच्या पत्नी वनिता गुळवे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. दुसरे केम येथील मोहिते पाटील समर्थक अजित तळेकर यांनी तालुका विकास आघाडी कडून पत्नी कल्याणी तळेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. केम गणात मोहिते पाटील समर्थक कल्याणी तळेकर यांच्या विरोधात जोरदार प्रचार यंत्रणा राबवत आहेत. त्यामुळे केम लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चौकट
पांडे जिल्हा परिषद गटात भाजपकडून रश्मी बागल उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई वारे व करमाळा तालुका विकास आघाडीकडून ज्योती सावंत निवडणूक लढवत आहेत. रश्मी बागल यांच्या विरोधात राणीताई वारे व ज्योती सावंत यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे बागल समर्थकांनी मध्यस्थी करून बागल व जगताप यांच्यातील मतभेदावर पडदा टाकत जगताप व बागल यांना एकत्र आणले आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी बागल व शिंदे युतीला जाहीर पाठिंबा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com