

आळंदी, ता. ५ : संत ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत १ ते ८ डिसेंबर दरम्यान भरणाऱ्या कार्तिकी वारीसाठी इंद्रायणी नदीत आंद्रा धरणातून पाणी सोडले जाणार आहे. नदीच्या प्रदूषणाची तीव्रता पाहता, तीर्थस्नानासाठी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुणे येथे झालेल्या बैठकीत प्रशासनाला हे महत्त्वपूर्ण आदेश दिले.
संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५१ व्या जन्मोत्सव वर्षाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या वारीसाठी सुमारे २० लाख भाविक येण्याची शक्यता आहे. या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (ता. ५) बैठक पार पडली. या वेळी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद पाटील, आळंदी देवस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीर, योगी निरंजन नाथ, पुरुषोत्तम महाराज पाटील, डी. डी. भोसले, संजय घुंडरे आणि विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांकडून तयारीचा आढावा घेतला आणि वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा पुरवण्यासाठी विविध आदेश दिले. इंद्रायणी नदी प्रदूषित असल्याने तीर्थस्नानासाठी भाविकांची गैरसोय होऊ नये, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. तसेच, दर्शनबारीतील गैरसोय टाळण्यासाठी प्रथमच जर्मन हँगर पद्धतीचा भव्य मंडप उभारला जाणार आहे.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय:
तीर्थस्नानासाठी मावळ तालुक्यातील आंद्रा धरणातून इंद्रायणी नदीत पाणी सोडणार.
दर्शनबारीसाठी सुमारे ७५ गुंठे जागेत २६ नोव्हेंबरपर्यंत जर्मन हँगर मंडप उभारणार.
इंद्रायणी नदीवरील धोकादायक झालेल्या पादचारी पुलाची (स्काय वॉक) दुरुस्ती २५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणार.
चिखल झालेल्या एसटी स्थानकाच्या जागेवर तातडीने मुरमीकरण व खडीकरण करणार.
वारी काळात २४ तास पाणी, वीजपुरवठा आणि दिंड्यांना सवलतीच्या दरात गॅस उपलब्ध करून देणार.
यंदाच्या कार्तिकी वारी सोहळ्यामध्ये राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समन्वयाने सुरळीतपणे पुरवायच्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून जास्तीत जास्त सुविधा पुरवण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे.
- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, पुणे
असा असेल मुख्य वारी सोहळा
वारी कालावधी : १ ते ८ डिसेंबर
१ डिसेंबर : गुरु हैबतबाबा पायरी पूजनाने वारीस प्रारंभ.
४ डिसेंबर : कार्तिकी एकादशी.
५ डिसेंबर : द्वादशीनिमित्त रथोत्सव.
६ डिसेंबर : संत ज्ञानेश्वर माउलींचा संजीवन समाधी दिन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.