

तळेगाव ढमढेरे, ता. २२ : कासारी (ता. शिरूर) येथील गावठाणासह वाडी-वस्तीवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीच्या विहिरीत पाणी नसल्याने पाणी योजना बंद पडली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून पंचायत समिती व तहसीलदारांकडे टँकरची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पाणीटंचाईच्या तीव्र झळा ग्रामस्थांना पोहोचत असल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ भुजबळ, शीतल भुजबळ, संतोष काकडे, सागर नेवसे, चंद्रहार भुजबळ व ग्रामस्थ यांनी मंगळवारी (ता. २३) सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कासारी येथे महिलांचा हंडा मोर्चाचे आयोजन केले आहे. हंडा मोर्चाचे पत्र ग्रामपंचायत व शिक्रापूर पोलिस ठाण्याला देण्यात आले आहे.
दरम्यान, कासारी गावची सुमारे २७०० लोकसंख्या आहे. गावातील ग्रामस्थांना सुमारे ६० हजार लिटर पाण्याची गरज असून, त्यासाठी एक सार्वजनिक विहीर आणि ७ हातपंप व ३९ कूपनलिका आहेत. हे पाण्याचे स्रोत सर्व कोरडे पडले आहेत. गावासाठी सध्या ५६००० लिटर पाण्याची गरज आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी तातडीने दोन दिवसात टँकर सुरू करावा, अशी मागणी ग्रामसेवक वसंत पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, चासकमानचे पाणी शासकीय तलावात सोडले नसल्यामुळे येथील तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत, त्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.