कासारसाई धरण पर्यटकांनी फुलले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

सोमाटणे - गुलाबी थंडी, सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी कासारसाई धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, येथील अपुऱ्या सुविधांबाबत पर्यटकांमध्ये नाराजी आहे. 

सोमाटणे - गुलाबी थंडी, सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी कासारसाई धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, येथील अपुऱ्या सुविधांबाबत पर्यटकांमध्ये नाराजी आहे. 

गेल्या महिनाभरापासून पारा उतरल्याने वातावरणात गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. अशा या थंडीत धरण परिसरातील संपूर्ण वातावरणच सुखद झाले आहे. सूर्योदय व सुर्यास्ताची कोवळी उन्हे पर्यटकांना आकर्षून घेत आहेत. ही सोनेरी किरणांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गेल्या काही दिवसांपासून पुन्हा गर्दी वाढू लागली आहे. विशेषतः पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबईतील पर्यटकांनीही कासारसाई धरणाला अधिक पसंती दिली आहे. त्यातच धरणातील बोटिंग, हिरव्यागार पिकांनी बहरलेली शेती, प्रदूषणमुक्त परिसर, चुलीवरील खमंग मावळी जेवण, धरणाच्या बॅक वॉटरजवळ सह्याद्रीच्या उंच रांगांनी त्यात भरच घातली आहे. डोंगर रांगांमधून डोकावणाऱ्या सूर्याच्या सोनेरी किरणांसमवेत सेल्फी काढण्याचा आनंद काही औरच. त्यामुळेच धरण परिसर पर्यटकांनी फुलून गेला आहे.

अपुऱ्या सुविधा
पर्यटकांची गर्दी वाढत असली, तरी येथील सुविधा अपुऱ्या आहेत. धरणाकडे जाणारा रस्ता कच्चा तसेच खड्डेमय आणि अरुंद आहे. या ठिकाणी निवासाची कोणतीही सोय नाही. सुरक्षिततेसाठी पोलिस यंत्रणा नाही, धोकादायक ठिकाणी सूचनाफलकांचा अभाव आहे. त्यामुळे मोठ्या उत्साहाने आलेल्या पर्यटकांची निराशा होते. 

Web Title: Kasarsai Dam Tourist