

KSG26A00089
कासेगाव (ता. पंढरपूर) : येथील कासेगावासह १४ गावांना पाणीपुरवठा करणारे हे जलशुद्धीकरण केंद्र मागील वीस दिवसांपासून बंद आहे.
---
भीमा नदी जवळ, तरी १४ गावे तहानलेली!
कासेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना; दुरुस्तीच्या कामाला शेतकऱ्यांचा विरोध
हनुमंत शिंदे : सकाळ वृत्तसेवा
कासेगाव, ता. ३१ : कासेगाव (ता. पंढरपूर) येथील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन लिकेज झाल्याने गेल्या २० दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे कासेगावसह परिसरातील १४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. भीमा नदी जवळ असूनही, दुष्काळी परिस्थितीमुळे विहिरी व बोअरवेलची पाणीपातळी खालावली असताना, शासनाची पाणीपुरवठा योजनाही बंद पडल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
या योजनेतून कासेगाव, गोपाळपूर, अनवली, एकलासपूर, शिरगाव, रांजणी, मुंढेवाडी, कोंढारकी, ओझेवाडी, सिद्धेवाडी, आंबे, नेपतगाव, तावशी व लक्ष्मी टाकळी या १४ गावांना पाणीपुरवठा केला जातो. पाइपलाइनची तातडीने दुरुस्ती करून पाणीपुरवठा पूर्ववत करावा, तसेच तोपर्यंत टँकर सुरू करावेत, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
गेल्या २० दिवसांपासून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. प्रशासनाने तातडीने टँकर सुरू करणे आणि पाइपलाइन दुरुस्तीचे काम हाती घेणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप गोपाळपूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सचिन आसबे यांनी केला.
---
अधिकाऱ्यांचे म्हणणे...
कासेगाव योजनेला इसबावी येथील भीमा नदीतून पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ही पाइपलाइन जुनी झाल्याने ठिकठिकाणी लिकेज होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतात लिकेज होत असल्याने ते दुरुस्तीला विरोध करीत आहेत. पाइपलाइन रस्त्याच्या कडेने न्यावी, अशी त्यांची मागणी आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क केला असून, त्यांच्या सूचनेनुसार लवकरच लिकेज काढून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता नितीन करवते यांनी सांगितले.
---
नवीन पाइपलाइनसाठी निधी मंजूर
कासेगाव योजनेची पाइपलाइन जुनी झाल्याने इसबावी परिसरात वारंवार लिकेज होत आहे. नवीन पाइपलाइन टाकण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. संबंधित शेतकऱ्यांची समजूत काढून पाणीपुरवठा लवकर सुरू करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असे गोपाळपूरचे माजी सरपंच विलास मस्के यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.