शरद पवार यांच्या काटेवाडीत निवडणुकीपूर्वी मिरवणूक, तीही मुख्याध्यापक बाईंची

ज्ञानेश्वर रायते
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

एखाद्या शिक्षकाला पुरस्कार मिळणे आणि त्याचा गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीत सत्कार करणे, ही काही नावीन्याची बाब उरली नाही...मात्र, मुख्याध्यापकाला पुरस्कार मिळाला, म्हणून सरपंचांसह गावाने रस्त्यावर उतरावे आणि एखाद्या निवडणुकीतील विजयी उमेदवाराप्रमाणे उघड्या जीपमधून डिजे लावून मिरवणूक काढावी, हे अनोखे चित्र आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या काटेवाडी गावात अनुभवले! 

बारामती (पुणे) : एखाद्या शिक्षकाला पुरस्कार मिळणे आणि त्याचा गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीत सत्कार करणे, ही काही नावीन्याची बाब उरली नाही...मात्र, मुख्याध्यापकाला पुरस्कार मिळाला, म्हणून सरपंचांसह गावाने रस्त्यावर उतरावे आणि एखाद्या निवडणुकीतील विजयी उमेदवाराप्रमाणे उघड्या जीपमधून डिजे लावून मिरवणूक काढावी, हे अनोखे चित्र आज काटेवाडीत अनुभवले! 

काटेवाडीतील गंगूबाई काटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका राणी ढमे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच मिळाला. त्यांना पुरस्कार मिळाल्याचा आनंद गावाला झाला. ढमे या दिव्यांग आहेत, मात्र त्या गावात रुजू झाल्यापासून शाळेत झालेले विधायक बदल टिपणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांच्या पुरस्काराचा आनंद व्यक्त करताना गावात मोठी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. 

ढमे यांनी यापूर्वी सणसर जिल्हा परिषद शाळेत काम करताना तेथील शाळेला नवा आकार दिला. शाळेची गुणवत्ता वाढवताना शिक्षकांमध्ये समन्वय ठेवला. त्यातून शाळा नावारूपाला आली. तेच धोरण काटेवाडीतही कायम ठेवल्याने ग्रामस्थ कमालीचे खूष आहेत. त्याच आनंदातून आज (ता. 7) सकाळी काटेवाडीतून भलीमोठी मिरवणूक निघाली. 

ढमे यांच्या बरोबर गावातील खेळाडू श्रुतिका कांबळे हिचीही मिरवणूक काढण्यात आली. केवळ जिल्हा परिषदेचेच नव्हे; तर छत्रपती माध्यमिक हायस्कूलचे विद्यार्थीही या मिरवणुकीत सहभागी झाले होते. रस्त्यात जागोजागी थांबून अगदी ज्येष्ठ नागरिक देखील ढमे यांचा सत्कार करीत होते. 

पदाधिकाऱ्यांकडून सारथ्य 
या मिरवणुकीचे सारथ्य गावच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, तंटामुक्त गाव समितीच्या सदस्यांपासून पोलिस पाटील, व्यावसायिक, पालकांनी केले. त्याचेच अप्रूप सर्वांत जास्त झाले. काटेवाडीला राजकीय मिरवणुका काही नवीन नाहीत, मात्र आज काटेवाडीत निघालेली ही ज्ञानदानाच्या कृतज्ञतेची मिरवणूक गावालाच नाही, तर रस्त्याने ये- जा करणाऱ्या प्रवाशांनाही चांगलीच भावली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: at Katevadi procession of teacher