esakal | कात्रज : दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची गैरसोय
sakal

बोलून बातमी शोधा

katraj

कात्रज : दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची गैरसोय

sakal_logo
By
अशोक गव्हाणे

कात्रज : नागरिक ज्या ठिकाणी लाखो रुपयांचा मुद्रांक शुल्क भरत असतात, अशा दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात कामांसाठी गेलेल्या नागरिकांना किमान मूलभूत सुविधादेखिल मिळत नाहीत. शासनाला लाखों रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या कार्यालयातच अशी अवस्था असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

भारती विद्यापीठ परिसरातील चैतन्यनगर येथिल सह दुय्यम निबंधक (वर्ग -२) हवेली क्रमांक ९ या कार्यालयात नागरिकांना पिण्यासाठी पाणी, बसण्यासाठी व्यवस्थित जागादेखिल नाही. त्यामुळे अनेक नागरिक दाराबाहेर दिवस-दिवसभर ताटकळत उभे असल्याचे चित्र असते. या कार्यालयात काही दिवसांपूर्वी पावसाचे पाणीही आले होते.

हेही वाचा: जिल्हयात उद्या स्वच्छता महाश्रमदान दिनाचे आयोजन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधे सॅनिटायझरही ठेवण्यात आल्याचे दिसत नाही. त्याचबरोबर काही ठिकाणी विज पुरवठा खंडित झाल्यास बॅटरी बॅकअपची सोय नसल्याने नागरिकांना वाट पाहण्याशिवाय पर्याय नसतो.

कोंढव्यातील खडीमशिन चौकात असणाऱ्या सह दुय्यम निबंधक (वर्ग -२) हवेली क्रमांक १२ या कार्यालयाच्या नावाचा तर साधा फलकही लावण्यात आलेला नाही. त्यामुळे हे कार्यालय नेमके कुठे आहे? हे नागरिकांच्या लक्षात येत नाही. तसेच, ज्या ठिकाणी ही कार्यालये आहेत, त्या जागा अपुऱ्या आहेत. कार्यालयाच्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क मिळत नाही. मग, नोंदणीच्या वेळी मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या ओटीपीसाठी नागरिकांची धावपळ होते. कार्यालयाच्या ठिकाणी व्यवस्थित साफसफाई होत नसल्याने उग्र वासही येतो. तसेच, याठिकाणी असणाऱ्या स्वच्छतागृहांचीही दुरवस्था झाल्याचे पाहायला मिळते. याबातीत नोंदणी महानिरिक्षक श्रावण हार्डीकर यांनी संबंधितांना संपर्क करून सुचना करण्यात येतील असे सांगितले आहे.

हेही वाचा: सांगली : एलईडी प्रकल्पाबाबत स्मार्ट कंपनीची याचिका फेटाळली

जागा अपुरी असल्याने नागरिकांना अडचणी येत असून यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला आहे. नवीन ठिकाणी कार्यालय सुरु करण्याचा विचार असून त्याचे काम प्रगतिपथावर आहे. जागेचा शोध सुरु आहे.

- संतोष जाधव, सह दुय्यम निबंधक, हवेली क्रमांक ९.

एकतर सरकारी कामाला गती नसते. त्यामध्येच इथे बसायला जागा नाही. त्यामुळे आपली वेळ येईपर्यंत बाहेर ताटकळत उभे राहावे लागते. सरकारला या कार्यालयांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो, त्यामुळे किमान मूलभूत सुविधातरी पुरवाव्यात ही अपेक्षा आहे.

- सुहास देशमुख, नागरिक.

loading image
go to top