कात्रज-कोंढवा काम ठप्प; मार्ग समस्यांच्या विळख्यात | Road Issue | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Katraj Kondhawa Road issue
कात्रज-कोंढवा काम ठप्प; मार्ग समस्यांच्या विळख्यात

कात्रज-कोंढवा काम ठप्प; मार्ग समस्यांच्या विळख्यात

कात्रज - कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम जागा हस्तांतरणाअभावी अतिसंथ गतीने सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामात गेली अडीच ते तीन वर्षे अडचणी येत असून काम जवळपास ठप्प झाल्यात जमा आहे. अशातच रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे अरुंद असलेल्या रस्त्यांवर खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत होत आहे. त्यामुळे अपघातांनाही आमंत्रण मिळत आहे.

खड्डे, खड्ड्यात साचणारे पावसाचे पाणी, छोटी-मोठी अतिक्रमणे, वाहतूककोंडी अशा अनेक समस्यांच्या विळख्यात हा मार्ग सापडला आहे. सद्यःस्थितीत असलेल्या रस्त्याची कुठल्याही प्रकारची किमान देखभाल दुरुस्तीही होत नाही.

पावसाळ्याच्या तोंडावर अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी या मार्गाची पाहणी केली होती. त्यानंतर वापरातील रस्ता दुरुस्ती व पर्यायी रस्ता विकसित करणे आवश्यक असल्याचे सांगून अंदाजे आराखडा तयार करून सद्यःस्थितीतील रस्त्याची दुरुस्ती करू, असे सांगितले होते. मात्र, त्यावर कुठलीही अंमलबजावणी झाली नाही. उलट रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत.

सद्यःस्थितीत कात्रज-कोंढवा रस्त्यांवर माऊली गार्डन जवळील बसथांब्यासमोर, शिवशंभोनगर गल्लीसमोरील बाजूस, गोकुळनगर चौक, खडीमशिन चौक पोलिस चौकी, खडीमशिन चौक आदी परिसरात खड्डे पडले आहेत. त्याकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

अपघातप्रवण क्षेत्र

  • राजस सोसायटी चौक

  • माउली गार्डन बसथांबा

  • पॅरामाउंट गार्डन

  • गोकूळनगर चौक

  • शत्रुंजयमंदिर चौक

  • टिळेकरनगर रस्ता

  • खडीमशिन चौक

रस्ता रुंदीकरणाचे काम कधी पूर्णत्वास जाणार आहे, हे माहिती नाही; परंतु आहे त्या रस्त्याची किमान देखभाल दुरुस्ती तरी करून नागरिकांना दिलासा द्यावा. कात्रज-कोंढवा रस्त्यावर गाडी चालविणे सध्या जिकिरीचे झाले असून, अपघात आणि वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळत आहे.

- संतोष लोंढे, स्थानिक नागरिक, गोकूळनगर

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खड्ड्यांच्या कामांसाठी जवळपास साडेचार कोटींची मान्यता घेण्यात आली आहे. त्यासाठी निविदा काढणार असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

- व्ही. जी. कुलकर्णी, मुख्य अभियंता, पथविभाग, महापालिका

loading image
go to top