पत्र्याची शाळा आता ‘कूल कूल’

सचिन कोळी
बुधवार, 4 एप्रिल 2018

कात्रज - तप्त उन्हाळा आणि घामाघूम होणारे विद्यार्थी हे गेल्या आठ वर्षांतील धनकवडी येथील महापालिका शाळेचे चित्र बदलण्यात लोकप्रतिनिधी यशस्वी झाले आहेत. शाळेची आंतर्बाह्य आकर्षक रंगरंगोटी करण्याबरोबरच प्रत्येक वर्गात उष्णतारोधक फॉल सीलिंग आणि पंखे बसवल्यामुळे पत्र्याची शाळा आता कूल कूल झाली आहे.

कात्रज - तप्त उन्हाळा आणि घामाघूम होणारे विद्यार्थी हे गेल्या आठ वर्षांतील धनकवडी येथील महापालिका शाळेचे चित्र बदलण्यात लोकप्रतिनिधी यशस्वी झाले आहेत. शाळेची आंतर्बाह्य आकर्षक रंगरंगोटी करण्याबरोबरच प्रत्येक वर्गात उष्णतारोधक फॉल सीलिंग आणि पंखे बसवल्यामुळे पत्र्याची शाळा आता कूल कूल झाली आहे.

धनकवडी येथील तब्बल दोन हजार विद्यार्थी असलेली महापालिकेची शाळा दहा वर्षांपूर्वी बंद झाली. त्यानंतर भारती विद्यापीठ परिसरातील महापालिका शाळेच्या इमारतीत धनकवडीची शाळा क्रमांक ९१ ही काही काळ सुरू राहिली. त्यानंतर रामचंद्रनगर परिसरात चार गुंठे जागा मिळाल्यानंतर पत्र्याच्या शेडमध्ये शाळा सुरू झाली. गेल्या आठ वर्षांत काही जुजबी सुधारणा झाल्या.

निम्म्या भिंती बांधून त्यावर पत्रे बसवण्यात आले. पावसाळ्यात गळणारे पत्रे बदलण्यात आले. परंतु विद्यार्थी व शिक्षकांची उन्हाळ्यात होणारी लाही लाही थांबवण्याची कोणतीच उपाययोजना आजवर झाली नाही. या शाळेत चार वर्ग आणि मुख्याध्यापक, सहशिक्षकांसाठी एक खोली आहे. पहिली ते चौथीचे वर्ग सकाळी भरतात, तर बालवाडीसह पाचवी ते सातवीचे वर्ग दुपारी भरतात. एकूण तीनशे विद्यार्थी भरउन्हाचा दाह सोसत शिक्षण घेतात. पत्र्याची शाळा हा कलंक पुसून टाकण्याचा निर्धार विद्यमान नगरसेवक विशाल तांबे, बाळासाहेब धनकडे आणि आश्विनी भागवत यांनी केला. त्यासाठी शाळा सुधार योजनेतून निधी मिळविला.

आता शाळा हवीहवीशी...
 तापलेल्या पत्र्याच्या झळा विद्यार्थ्यांपर्यंत पोचू नयेत म्हणून सर्व वर्गांत उष्णतारोधक तावदाने बसवण्यात आली. प्रत्येक वर्गात दोन पंखे बसवण्यात आले. शाळेचे वातावरण प्रसन्न आणि उत्साहवर्धक व्हावे यासाठी शाळेला आंतर्बाह्य आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली. एकूणच शाळेची जर्जर अवस्था बदलून ती खासगी शाळांपेक्षाही आधिक आकर्षक करण्यात आली. आता आम्हाला उन्हाचा त्रास होत नसल्यामुळे एकाग्रता वाढली आहे, उन्हळ्यात नकोशी वाटणारी शाळा आता आम्हाला हवीहवीशी वाटू लागली आहे, असे मत विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. शाळेत झालेला बदल पाहून पालकही आनंदी झाले आहेत.

Web Title: katraj news corporator changing picture of municipal school