

कात्रज, ता. २५ : सुखसागरनगर भाग १, भाग २ राजीव गांधीनगर, साईनगर, अंजनीनगर, संतोषनगर, अप्पर, बिबवेवाडी, इंदिरानगर परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
शनिवारी (ता. २४) अंजनीनगरमधील गल्ली क्रमांक ८ आणि ९ मध्ये सकाळी साडेनऊपासून रात्री साडेसातपर्यंत, तर सुखसागरनगर डाके चौकातील वीजपुरवठा सहा तास बंद होता. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने केबल नादुरुस्त किंवा विद्युत रोहित्रात बिघाड झाल्याचे कारण सांगण्यात येत आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वीही दिवसभर वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला होता.
परिसरात वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी केवळ तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे केले जात असल्याने महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने घरगुती कामे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि इतर दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत आहे. अचानक वीज गायब होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन वेळापत्रकही विस्कळीत होत आहे. दोन दिवसांपूर्वी दिवसभर वीजपुरवठा बंद राहिल्यानंतरही पुन्हा त्याच परिसरात वीज गायब झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
शनिवारी सुखसागरनगर परिसरात सहा तास वीज गायब होती. वैद्यकीय उपकरणे विजेशिवाय चालत नसल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यात एखादा अडचणीतील रुग्ण हजर झाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. महावितरणने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
- डॉ. मनोहर जाधव, संचालक, सुश्रुत क्लिनिक
वारंवार वीजपुरवठा खंडित होऊनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसतील, तर ग्राहकांनी नेमकी कोणाकडे दाद मागायची, महावितरणने केवळ बिघाडाचे कारण सांगून वेळ मारून नेण्याऐवजी तातडीने दुरुस्ती करावी, तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी वीज वितरण यंत्रणेची तपासणी करून ठोस उपाययोजना कराव्यात.
- ज्ञानोबा मुंडे, स्थानिक नागरिक
सुखसागरनगर भागात विद्युत रोहित्राच्या खराबीमुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, त्याचे काम युद्धपातळीवर करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
- शंकर खवले, शाखा अभियंता, महावितरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.