

काझिरंगा, ता. १५ : वन्यजीव संवर्धन क्षेत्रात भारताने आज मोठी झेप घेत देशातील पहिले सॅटेलाइटशी जोडलेला टॅग असलेले ‘गँगेज सॉफ्टशेल’ प्रजातीचे कासव आसाममधील काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात सोडले. या टॅगद्वारे कासवाची माहिती उपग्रहापर्यंत पोहोचून त्याच्या हालचालीवर देखरेख ठेवता येणार आहे.
‘लुप्तप्राय प्रजाती दिना’चे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला असून, यामुळे कासवांच्या अधिवासाचा अभ्यास करणे सोपे होणार आहे. ‘गँगेज सॉफ्टशेल’ कासव हा गोड्या पाण्यातील सरपटणारा प्राणी आहे. प्रामुख्याने उत्तर आणि पूर्व भारतातील गंगा आणि महानदी या नद्यांच्या खोऱ्यात या कासवांचे अस्तित्व आढळते. या कासवाला सॅटेलाइट टॅग लावल्यामुळे त्याच्या स्थलांतराचे मार्ग, अन्नाचा शोध आणि पाण्याचे तापमान यांसारखी महत्त्वाची शास्त्रीय माहिती संशोधकांना मिळणार आहे. यामुळे भविष्यात या प्रजातीच्या संवर्धनासाठी अधिक प्रभावी धोरणे आखणे शक्य होईल. वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ अंतर्गत ही प्रजाती संरक्षित आहे. या कासवांना पकडणे किंवा जवळ बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे. काझिरंगा राष्ट्रीय उद्यानातील या यशस्वी प्रयोगामुळे लुप्तप्राय होत चाललेल्या या जलचर प्राण्याच्या संरक्षणाला नवीन दिशा मिळाली असून, वन्यजीव प्रेमींकडून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ‘एक्स’वर याबाबत माहिती दिली. ‘‘काझिरंगा आणि संपूर्ण देशासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. वन्यजीव संरक्षणाच्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल असून आसाममधील जैवविविधता जपण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आपल्या जंगलात वास्तव्यास असलेल्या प्रत्येक प्रजातीचे संरक्षण करणे, हे आमचे कर्तव्य आहे,’’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.