

केडगाव, ता. १३ : दौंड तालुक्यातील केडगाव येथे किरकोळ कारणावरून सुभाष (वय अंदाजे ३०, पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांना लाथाबुक्यांनी मंगळवारी (ता. १२) रात्री मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिघांवर यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. तिघांना दौंड न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. नंदू जाधव (रा. वांबोरी, ता. राहुरी), राजेंद्र केदारी (रा. सोनाई, ता. नेवासा) आकाश कांबळे (रा. बासुंबा, ता. हिंगोली) असे कोठडी सुनावलेल्यांचे नाव आहे. तर अजय गुळमे (रा. केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी सुभाष याच्या गळ्यावर व पोटावर मारहाण करून त्याचा खून केला. आरोपींनी पळून जाण्यासाठी अजय गुळमे यांची घरासमोर लावलेली जीप चोरून नेली. पोलिसांनी आरोपींना श्रीगोंदा येथून अटक केली आहे. दरम्यान, मृत व आरोपी हे बांधकाम मजूर आहेत.