तावशी (ता. पंढरपूर) : येथील शिक्षक राजेंद्र आसबे यांच्या केशर आंब्याच्या झाडाची पाहणी करताना माजी आमदार दत्तात्रय सावंत.
25 हजार केशरी आंब्याच्या झाडांना बाळसे; शिक्षकांच्या द्वारी आंब्यांला मोहोर
पंढरपूर : पर्यावरण संतुलनाबरोबरच वृक्ष लागवड चळवळ अधिक गतिमान व्हावी उद्देशाने दीड वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यात सुमारे २४ हजार केशर आंब्याची लागवड करण्यात आली आहे. दीड वर्षांनंतर आता २५ हजार केशर आंब्यांच्या झाडांनी बाळसे धरले आहे. अवघ्या दीड वर्षांतच अनेक झाडांना मोहोर आला आहे. आंब्याची लागवड केलेल्या शिक्षकांना यंदाच्या हंगामात केशर आंब्याची गोड चव चाखता येणार आहे. तावशी (ता. पंढरपूर) येथील शिक्षक राजेंद्र आसबे यांच्या शेतात लावण्यात आलेल्या आंब्याच्या झाडांची माजी आमदार सावंत यांनी नुकतीच पाहणी करून समाधान व्यक्त केले.
माजी आमदार सावंत यांनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रत्येक शिक्षकांना झाडे लावण्याचे आवाहन केले होते. शिवाय त्यांनी स्वखर्चातून जून २०२४ साली जिल्ह्यातील सुमारे २५ हजार शिक्षकांना केशर आंब्यांचे रोप भेट दिले होते. दिलेल्याची रोपाची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी संबंधित शिक्षकांवर देण्यात आली होती. त्यानुसार शंभर टक्के शिक्षकांनी आंब्याची लागवड केली आहे. दीड वर्षानंतर प्रत्येक शिक्षकाच्या घरासमोर किंवा परसबागेत केशर आंब्याला मोहोर आला आहे.
जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींना कौतुकआंब्यांच्या लागवडीनंतर दीड वर्षांत रोपांचे छोट्या झाडात रूपांतर झाले आहे. सावंत यांनी झाड रुपी दिलेली भेट आमच्यासाठी केवळ झाड नसून ती आमची संपत्ती आहे अशी भावना शिक्षक राजेंद्र आसबे यांनी व्यक्त केली आहे. श्री. सावंत यांच्या उपक्रमाचे जिल्ह्यातील शिक्षकांमधून व पर्यावरण प्रेमीमधून स्वागत व कौतुक केले जात आहे.
सोलापूर जिल्हा उष्ण आणि दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. पर्जन्यमान वाढावे आणि पर्यावरण संतुलन राहावे यासाठी जून 2024 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 25 हजार शिक्षकांना केशर आंब्याचे रोप भेट देण्यात आले होते. प्रत्येकाला लावलेल्या रोपांचे जतन आणि संवर्धन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जवळपास शंभर टक्के रोपांचे संवर्धन झाले आहे. यापुढच्या काळातदेखील वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रयत्न केले जातील.
दत्तात्रय सावंत, माजी आमदार

