रहिमतपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी केतन माने यांची बिनविरोध निवड
रहिमतपूरच्या उपाध्यक्षपदी केतन माने
निवड बिनविरोध; भाजपकडून किरण भोसले, राष्ट्रवादीकडून सुनील माने स्वीकृत नगरसेवक
रहिमतपूर, ता. १६ : पालिकेच्या उपाध्यक्षपदासाठी आज झालेल्या विशेष सभेत केतन आनंदराव माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याच सभेत दोन नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये भाजपकडून किरण शिवाजी भोसले यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेकडून सुनील माने यांच्या नावांना पसंती देण्यात आली, तसेच विविध विषय समित्यांच्या सदस्य संख्येवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा वैशाली माने यांच्या उपस्थितीत उपाध्यक्षपदासाठी आज सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत अर्ज मागविण्यात आले होते. या विहित मुदतीत केतन माने यांचा एकमेव अर्ज मुख्याधिकाऱ्यांकडे दाखल झाला. अन्य कोणताही अर्ज प्राप्त न झाल्याने पीठासीन अधिकारी नगराध्यक्षा वैशाली माने यांनी केतन माने यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली. निवड जाहीर होताच समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.
प्रक्रियेदरम्यान स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपकडून किरण शिवाजी भोसले, तर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीकडून सुनील माने हे नगरसेवकपदी निवडून आल्याचे नमूद करण्यात आले. शासकीय नियमानुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये प्राप्त अर्जांच्या छाननीनंतर दोन नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. या नियुक्त्यांची घोषणा पीठासीन अधिकारी नगराध्यक्षा वैशाली माने यांनी केली.
सभेत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ६५ (३) नुसार चार विषय समित्यांची रचना निश्चित करण्यात आली. प्रत्येक समितीमध्ये पाच सदस्य असतील, असा निर्णय बहुमताने घेण्यात आला, तसेच कायद्यातील तरतुदीनुसार नवनियुक्त उपनगराध्यक्ष केतन माने हे स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीचे पदसिद्ध सभापती असतील, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
या वेळी माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे, नगरसेवक नीलेश माने, विपुल साळुंखे, आरजू आतार, विद्याधर बाजारे, नाना राऊत, हसीना डांगे, तुषार चव्हाण, राजेश कदम, रणजित माने, मयुरेश माने, अमर काटे, अविनाश माने, दिलीप कदम, भानुदास भोसले, शशिकांत भोसले, हिम्मत माने यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो :...........01586
रहिमतपूर : केतन माने यांच्या निवडीबद्दल त्यांच्या सत्कारप्रसंगी नगरसेवक व मान्यवर. (इम्रान शेख : सकाळ छायाचित्रसेवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

