

दावडी, ता. २१ : खेड तालुक्याच्या पूर्व भागात महिनाभराच्या खंडानंतर रविवारी (ता. २०) रात्री आणि सोमवारी (ता. २१) दुपारी पावसाने हजेरी लावली. यामुळे सुकण्याच्या मार्गावर असलेल्या सोयाबीन पिकाला मोठा दिलासा मिळाला असून उत्पादनातील घट टळण्याची आशा निर्माण झाली आहे.
दावडी, निमगाव, चिंचोशी, कनेरसर, खरपुडी, वाफगाव, रेटवडी, वरुडे परिसरात मोठ्या क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने पिकांची वाढ चांगली झाली होती. मात्र, त्यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला. परिणामी सोयाबीनची पाने पिवळी पडून काही ठिकाणी झाडे सुकण्यास सुरुवात झाली होती. पिकाची ही अवस्था पाहून शेतकरी संकटात सापडले होते.
दरम्यान, सोमवारी दुपारी झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. काही भागांत पावसाचे प्रमाण हलके असल्याने पिकासाठी आणखी दमदार पावसाची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आगामी काळात चांगला पाऊस झाल्यास सोयाबीनची स्थिती पूर्णपणे सुधारण्यास मदत होईल.
महिनाभर पाऊस नसल्याने सोयाबीनचे पीक सुकण्यास सुरुवात झाली होती. रविवारी रात्री आणि सोमवारी दुपारी झालेल्या पावसामुळे पिकाला चांगला आधार मिळाला आहे. मात्र, जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होण्यासाठी आणखी चांगल्या पावसाची आवश्यकता आहे.
- हरिदास पवळे, रेटवडी (ता. खेड)
00613
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.