
Khadaki Rain : पावसाने खडकीला चांगलेच झोडपले; अनेक वाहनांचे नुकसान, प्रचंड वाहतूक कोंडी
खडकी - पूर्व मान्सूस पावसाने खडकीला चांगलेच झोडपले. गुरुवारी सायंकाळी साडे पाच वाजता जोरदार वा-यासह झालेल्या पावसामुळे या भागात अनेक ठिकाणी दहा झाडपडीच्या घटना घडल्या. यामधे रस्त्यांवर झाडांच्या मोठ्या फांद्या पडल्याने अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. खडकीतील मुख्य डॉ. आंबेडकर रस्त्यावर पिंपळाच्या झाडाची मोठी फांदी अचानक पडल्याने रस्त्यावरील चारचाकी व दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले.
सुदैवाने यामधे कोणालाही इजा झाली नाही. अशी माहिती खडकी कॅन्टोन्मेंटच्या अधिका-यानी दिली. खडकी रेल्वे स्टेशन रस्त्यानजीकही झाडे पडल्याने पार्किंग केलेल्या दुचाकी वाहनांचे नुकसान झाले. मुख्य रस्त्यावर झाडे पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती वाहतूक सुरळीत करण्याचे वाहतूक विभागाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात होते. खडकी बाजारातील शेवाळे टॉवर या रहिवासी इमारतीतील डीपीवर झाड पडल्याने या भागातील वीज पुरवठा खंडीत झाला तर दर्जी गल्ली येथील घरावरही झाड पडून घराचे नुकसान झाले. तसेच गुरुद्वारा, बोहरी मस्जिद आदी ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्याने नुकसान झाले. मान्सून पूर्व पावसात ही दैना उडाल्याने पावसाळ्यात कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागणार याची चर्चा खडकीकरांमध्ये रंगली होती.
शिरीष पत्की, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक, खडकी कॅन्टोमेंट बोर्ड- पावसापूर्वीची कामे नाले सफाई, फांद्या तोडण्याचे काम सुरु आहे. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे जुन्या झाडांच्या फांद्या पडल्याच्या आठ ते दहा घटना घडल्या तसेच वाहनांचे नुकसान झाले. फांद्या हटवण्याचे काम बोर्ड कर्मचार्याकडून युद्धपातळीवर केले जात आहे.
अजहर खान, रहिवासी, दर्जी गल्ली, खडकी बाजार - माझ्या घरावर अचानक झाडाची फांदी पडल्याने पत्रे व पाण्याच्या टाकीचे नुकसान झाले. सुदैवाने माझे कुटुंब शेजारी होते व मी कामावर होतो त्यामुळे आम्हाला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र अशा घटनांची कोण जबाबदारी घेणार . खडकीत अनेक ठिकाणी जुनी जीर्ण झालेली झाडे आहेत त्यांची मुळे घरांमधे भिंतीमधे घुसली आहेत. यावर बोर्डाकडून दखल घेतली गेली पाहिजे.
अतुल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते, खडकी- बोपोडी-खडकीत मेट्रोमुळे वाहतूक वळवल्याने आधीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते आता ही रस्त्यांवर झाडे पडल्याने नागरीकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले आहे. याची दखल प्रशासनाने घेतली पाहिजे. घटना घडल्या नंतर प्रशासन जागे होते, मात्र सामान्य नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.