Loksabha 2019 : खडकवासल्याचे मतदान ठरणार निर्णायक 

मंगेश कोळपकर 
गुरुवार, 25 एप्रिल 2019

बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातही यंदा सर्वाधिक मतदान झाले आहे. गेल्या लोकसभेच्या तुलनेत खडकवासल्यातून तब्बल 54 हजारांनी मतदान वाढले आहे.

पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातही यंदा सर्वाधिक मतदान झाले आहे. गेल्या लोकसभेच्या तुलनेत खडकवासल्यातून तब्बल 54 हजारांनी मतदान वाढले आहे. बारामती शहरात मतदानाची टक्केवारी वाढली असली, तरी सर्वाधिक मतदान खडकवासल्यात झाले आहे. त्यामुळे हेच मतदान निर्णायक ठरणार आहे. पर्यायाने राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे अथवा भाजपच्या रंजना कुल यांचे भवितव्य ठरविताना खडकवासला महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 

बारामती मतदारसंघात 61. 54 टक्के मतदान झाले. गेल्या वेळेस 58. 87 टक्के मतदान झाले होते. यंदा सुमारे तीन टक्‍क्‍यांनी मतदानात वाढ झाली. या मतदारसंघात यंदा एकूण 12 लाख 99 हजार 792 मतदान झाले. त्यातील दोन लाख 51 हजार 606 मतदान खडकवासल्यातून झाले आहे. बारामती शहरातून 2 लाख 38 हजार 283, दौंडमधून 1 लाख 94 हजार 572, इंदापूरमधून 1 लाख 94 हजार 572, पुरंदरमधून 2 लाख 10 हजार 396 आणि भोरमधून 96 हजार 596 मतदान झाले. बारामती शहरातून यंदा 28 हजार 350, तर खडकवासल्यातून 54 हजार 509 मतदान वाढले आहे. त्यामुळे हे वाढलेले मतदानही निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. 

गेल्या निवडणुकीत खडकवासला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांना 27 हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. त्या वेळीही बारामती शहरातून मिळालेल्या मताधिक्‍यावर राष्ट्रवादी तरली होती. त्यामुळेच यंदा राष्ट्रवादीने कात्रज, धनकवडी, आंबेगाव, तसेच सिंहगड रस्ता आणि वारजे, शिवणे, बावधनवर लक्ष केंद्रित केले होते. त्यासाठी सातत्याने जाणीवपूर्वक प्रयत्नही केले होते. लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही या मतदारसंघातून भाजपला सुमारे 62 हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. त्यामुळे ते टिकविण्यावर आणि वाढविण्यावर भाजपने नेटाने प्रयत्न केले. या मतदारसंघातील भाजपचे सुमारे 17, तर राष्ट्रवादीचे 11 नगरसेवक आहेत. विद्यमान आमदारही भाजपचे आहेत. त्यातच लगतच्या ग्रामपंचायतीमधील सदस्यांची कुमकही होती. आघाडीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, तर युतीच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या होत्या. तसेच संघटनात्मक पातळीवरही भाजपने खडवासल्यावर अधिक लक्ष दिले होते. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला, तरी वाढलेले मतदान कोणाला मिळणार, यावरच या मतदारसंघातील खासदारांचे नाव निश्‍चित होणार आहे.

लोकसभा 2019


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khadakwasla Assembly Constituency Polling Decisive