दौंड, इंदापूरच्या शेतकऱ्यांसाठी खूशखबर; खडकवासला कालव्याची दुरुस्ती पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 December 2019

कालव्याच्या दुरुस्ती दरम्यान पाटबंधारे विभागाचे लहान-मोठे पोकलेन मशीन व वीस डंपरच्या सहाय्याने कालव्यातील गाळ काढण्यात आला. ज्या ठिकाणी कालव्याचा भराव पावसाने कमकुवत झाला होता अशा ठिकाणी मुरूम टाकून मजबुतीकरण करण्यात आले.

पुणे : खडकवासला धरणापासून फुरसुंगीपर्यंत सुरू करण्यात आलेले खडकवासला कालव्याच्या दुरुस्तीचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून उद्या (रविवार) सकाळी सहा वाजल्यापासून दौंड, इंदापूर व हवेली या तालुक्यांतील शेतीला रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. सुमारे चाळीस दिवसांचे हे आवर्तन असणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उद्या सकाळी सहा वाजता 350 क्युसेक, दुपारी बारा वाजता 700 क्युसेक व चार वाजल्यापासून 951 क्‍युसेकने पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती खडकवासला धरण शाखा उपअभियंता व कालव्या संबंधी काम पाहणारे पोपटराव शेलार यांनी दिली. खडकवासला कालव्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पाणी बंद करण्यात आले होते. कालव्याच्या दुरुस्ती दरम्यान पाटबंधारे विभागाचे लहान-मोठे पोकलेन मशीन व वीस डंपरच्या सहाय्याने कालव्यातील गाळ काढण्यात आला. ज्या ठिकाणी कालव्याचा भराव पावसाने कमकुवत झाला होता अशा ठिकाणी मुरूम टाकून मजबुतीकरण करण्यात आले. भरावावर उगवलेली झुडपे तोडण्यात आली. प्लास्टिक व इतर कचरा काढण्यात आला. अशी माहिती शेलार यांनी दिली.

"पुढच्या टप्प्यात फुरसुंगी पासून पुढे कालव्याची दुरुस्ती केली जाणार आहे. नागरिकांनी कालव्यामध्ये कचरा फेकू नये. प्लास्टिक,जुने कपडे, निर्माल्य भरलेल्या प्लास्टिक पिशव्या असा कचरा मोठ्या प्रमाणात कालव्यातून काढण्यात आलेला आहे. कचर्‍यामुळे पाणी दूषित होत आहे. कालव्याच्या आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा कचरा कालव्यामध्ये फेकू नये", असे आवाहन शेलार यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khadakwasla canal work completed water released to Daund and Indapur