

खडकवासला, ता. २ : पुणे- पानशेत रस्त्यावरील खडकवासला धरण चौपाटी परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी खडकवासला चौक ते चौपाटी क्रमांक २ (डीआयएटीच्या पुढील बाजूस) या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुमारे अडीच ते तीन किलोमीटरचा ‘नो- पार्किंग झोन’ करण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी जाहीर केला आहे. या निर्णयामुळे चौपाटी परिसरातील बेशिस्त पार्किंगला आळा बसून, वाहतुकीला शिस्त लागण्याची अपेक्षा आहे.
नांदेड सिटी वाहतूक विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या या रस्त्यावर पर्यटक आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. सकाळच्या वेळेत सिंहगड-पानशेत परिसरात जाणारे पर्यटक तसेच केवळ खडकवासला चौपाटी परिसरात येणाऱ्या पर्यटकांची वाहने मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जातात. त्यामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. अनेकदा वाहनांच्या रांगा चार-पाच किलोमीटरपर्यंत लागतात. रात्री नऊ वाजेपर्यंतही कोंडी कायम राहण्याच्या घटना घडतात.
या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका सिंहगड- पानशेत परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना बसतो. पुणे शहरात ये- जा करणाऱ्या नागरिकांचा मोठा वेळ कोंडीत जातो. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकांनाही कोंडीत अडकण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे गंभीर रुग्णांच्या उपचारात विलंब होत असून, या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी सातत्याने होत आहे. या मार्गावर वाहतूक कोंडीचा फटका मंत्री, आमदार आणि अधिकारी वर्गालाही बसल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत.
दरम्यान, खडकवासला धरण चौपाटी व परिसरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खडकवासला मतदारसंघातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यावतीने ९ ऑगस्ट रोजी खडकवासला धरण चौकात आंदोलन करण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून काही वेळ वाहतूक रोखत प्रशासनाचा निषेध केला होता.
या पार्श्वभूमीवर प्रस्तावित ‘नो-पार्किंग झोन’बाबत नागरिकांच्या काही सूचना किंवा हरकती असल्यास त्या १७ सप्टेंबरपर्यंत लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे. सूचना व हरकती पोलिस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, एअरपोर्ट रस्ता, पुणे या पत्त्यावर पाठवाव्यात.
सुटीच्या दिवशी कोंडी अधिक तीव्र
खडकवासला धरण व चौपाटी परिसरात शनिवार-रविवारी आणि इतर सुटीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होते. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी अधिक तीव्र होते. प्रस्तावित नो-पार्किंग झोनमुळे रस्त्यावरील वाहनांची अडथळामुक्त हालचाल होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.