खडेश्वरी महाराज यांची आत्महत्या 

डी. के. वळसे पाटील
शनिवार, 28 जुलै 2018

रविनाथजी महाराज हे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. आदित्यनाथ यांनी रविनाथजी यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याचे कौतुक केले होते.

मंचर : नाथपंथीय तपस्वी हटयोगी पंथाचे प्रमुख रविनाथजी उर्फ खडेश्वरी महाराज (वय ८६) यांनी शनिवारी (ता.२८) अवसरी फाटा- गोरक्षनाथ टेकडी (ता.आंबेगाव) येथील आश्रमात आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजले नाही. त्यांच्या निधनाची माहिती समजल्यानंतर हजारो भाविक टेकडीवर आले होते. पार्थिवाच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती. अनेकांना दु:ख अनावर झाले होते. रविवारी (ता. २९) गोरक्षनाथ टेकडी येथे त्यांना समाधी देण्याचा कार्यक्रम होणार आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त शुक्रवारी (ता. २७) गोरक्षनाथ टेकडीवर झालेल्या कार्यक्रमात अनेक भाविकांनी त्यांचे दर्शन घेतले होते. त्यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम झाला. खग्रास चंद्रग्रहण निमित्ताने त्यांनी रात्री ध्यानधारणा केली. शनिवारी सकाळी उठल्यानंतर त्यांनी आलेल्या भाविकांबरोबर चर्चाही केली. त्यांनंतर ते विश्रांतीसाठी खोलीत गेले. काही भाविक त्यांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी त्यांना गळफास घेतल्याचे दिसून आले. मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. त्यानंतर मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

रविनाथजी महाराज हे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. आदित्यनाथ यांनी रविनाथजी यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याचे कौतुक केले होते. रविनाथजी यांनी भीमाशंकर येथे चार वर्ष व गोरक्षनाथ टेकडी येथे आठ वर्ष उभे राहून एकूण बारा वर्ष तपश्चर्या केली होती. त्यामुळे त्यांना नाथ पंथाने खडेश्वरी ही पदवी बहाल केली होती. 

हरियाणा, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली, जम्मू काश्मीर आदी राज्यांत त्यांचे आश्रम आहेत. दर बारा वर्षांनी कुंभमेळ्या निमित्त त्र्यंबकेश्वर ते मँगलोर नाथपंथीय पायी झुंडीच्या नियोजनाची जबाबदारी ते पार पाडत होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गोरक्षनाथ टेकडी परिसर विकसित करण्यात आला आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्रीय एकात्मता, वृक्ष लागवड व संवर्धनाच्या कामात त्यांचा सक्रीय सहभाग होता. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी मदत करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. 31) सकाळी दहा वाजता अवसरी फाटा गोरक्षनाथ टेकडी येथे शोकसभेचे आयोजन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khadeshwari Maharaj did Suicide