esakal | खडीमशिन चौक-मंतरवाडी रस्ता धोकादायक 
sakal

बोलून बातमी शोधा

खडीमशिन चौक-मंतरवाडी रस्ता धोकादायक 

अवजड वाहतुकीच्या मार्गावरील पिसोळी, उंड्री, हांडेवाडी येथे रस्त्याची कामे झाली नाहीत. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी ही दररोजची डोकेदुखी झाली आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीवच धोक्‍यात आला आहे.

खडीमशिन चौक-मंतरवाडी रस्ता धोकादायक 

sakal_logo
By
अनिल सावळे

"सकाळ'कडून महामार्गाची पाहणी; कॉंक्रिटीकरणाचे काम रखडले 

पुणे - कोंढव्यालगतच्या खडीमशिन चौकापासून मंतरवाडीपर्यंत महामार्गावरील सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम सहा महिन्यांपासून रखडले आहे. या अवजड वाहतुकीच्या मार्गावरील पिसोळी, उंड्री, हांडेवाडी येथे रस्त्याची कामे झाली नाहीत. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी ही दररोजची डोकेदुखी झाली आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीवच धोक्‍यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ही गंभीर परिस्थिती ओढवली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

खडीमशिन चौकापासून मंतरवाडीपर्यंत महामार्गावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. नागरीकरण वाढले आहे; परंतु रस्त्याचे कॉंक्रिटीकरण रखडल्यामुळे नागरिकांना त्रास होतो. खडीमशिन चौकापासून मंतरवाडी चौकापर्यंत महामार्गाची "सकाळ'कडून पाहणी करण्यात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केलेल्या नाहीत. रस्ता धोकादायक बनल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे. 

कामाची सद्य:स्थिती 
खडीमशिन चौकापासून पिसोळीपर्यंत सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम झाले; परंतु पिसोळीतील धर्मावत पेट्रोल पंपाजवळ काम अर्धवट ठेवले आहे. पद्मावती मंदिर ते जगदंबा भवन चौकापर्यंत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रहिवाशांसह चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

जगदंबा भवन चौकापासून पुढे काही अंतरापर्यंत कॉंक्रिटीकरण झाले आहे. मात्र, उंड्री चौकाच्या अलीकडे आणि पुढे काही अंतरापर्यंत काम रखडले आहे. या भागात खड्डे आणि अतिक्रमणांमुळे कोंडी होत आहे. उंड्रीपासून पुढे हांडेवाडी चौकापर्यंत रस्त्याचे काम झाले; परंतु हांडेवाडी चौकाच्या पुढे रस्त्याचे काम अपूर्ण आहे. तेथून उरुळी देवाची येथील कचरा डेपोच्या अलीकडे काही अंतरापर्यंत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण झाले. कचरा डेपोसमोर डांबरी रस्ता असून, त्यापुढे उरुळी देवाचीपर्यंत कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे; परंतु मंतरवाडी चौकाजवळ काम रखडले आहे. 

तरुणीचा बळी जाऊनही गांभीर्य नाही 
खडीमशिन चौकापासून पिसोळीपर्यंत दुभाजक नाहीत. पद्‌मावती मंदिराजवळ मोठे खड्डे पडले आहेत. येथे नुकत्याच एका अपघातात तरुणीला जीव गमवावा लागला; परंतु अजूनही सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी याकडे गांभीर्याने पाहत नाहीत; तसेच विजेअभावी रात्री खड्डे आणि असलेले दुभाजक दिसत नाहीत. 

सेवा रस्त्यांचा अभाव 
पिसोळी, उंड्री आणि हांडेवाडीत नवीन सोसायट्यांमुळे नागरीकरण वाढल्यामुळे वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे सेवा रस्त्याची (सर्व्हिस रोड) गरज भासत आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी लोकप्रतिनिधींचे गांभीर्याने ऐकत नाहीत. नागरिकांना खड्डे आणि धुळीचा त्रास सहन करावा लागतो. खड्डे तातडीने बुजवावेत. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी सुरक्षित रस्त्यासाठी प्रयत्न करावेत, एवढीच अपेक्षा आहे. 
-गणेश खोटाले, रहिवासी, पिसोळी 

कामाचे बिल थकल्यामुळे ठेकेदाराने सहा महिन्यांपासून काम थांबविले आहे. ते बिल अदा करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. पथदिवे संबंधित ग्रामपंचायतींनी बसविणे अपेक्षित आहे. खडीमशिन ते पिसोळीपर्यंत रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे दुभाजक बसविले नाहीत. 
- चंद्रशेखर कुलकर्णी, उपविभागीय अभियंता, हवेली 1 

loading image
go to top