

खंडाळा कारखान्याचा बिगुल वाजला
उद्यापासून अर्ज दाखल; २२ नोव्हेंबरला मतदान होणार
लोणंद, ता. १७ : खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगूल वाजला असून, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांच्या वतीने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. सोमवारपासून (ता. १९) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. या कारखान्याच्या एकूण २१ जागांसाठी २२ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
म्हावशी (ता. खंडाळा) येथील खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखानाच्या २०२६- २७ ते २०३१-३२ या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्या वतीने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला गेला आहे. त्यानुसार सोमवारी (ता. १९) ते २६ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते ३ या वेळेत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खंडाळा यांचे कार्यालयातील निवडणूक कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता दाखल अर्जाची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ता. २७ रोजी अर्जाची छाननी प्रक्रिया, तर ता. २८ रोजी सकाळी ११ वाजता वैध ठरलेल्या अर्जाची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २८ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
निवडणूक रिंगणातील उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे व चिन्ह वाटप १३ नोव्हेंबरला दुपारी १२.३० वाजेपर्यंत होणार आहे. २२ नोव्हेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. २४ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. त्याच दिवशी विजयी उमेदवार घोषित करण्यात येणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक डॉ. प्रगती बागल काम पाहणार असून, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून खंडाळ्याच्या सहाय्यक निबंधक प्रीती काळे व वाईचे सहाय्यक निबंधक अनिल क्षीरसागर काम पाहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.