कऱ्हाड शाडूच्या गणेश मूर्तींची संख्या पोचली चार हजारांवर

कऱ्हाड शाडूच्या गणेश मूर्तींची संख्या पोचली चार हजारांवर
Published on

कऱ्हाडला चार हजारांवर शाडू गणेशमूर्ती

पालिकेच्या जनजागृती मोहिमेला यश; स्वागतही होणार पर्यावरणपूरक

कऱ्हाड, ता. ११ ः येथील पालिका, पर्यावरणप्रेमींसह विविध संस्थांनी पर्यावरण प्रबोधनाबद्दल राबवलेल्या प्रभावी जनजागृतीमुळे यंदा शहरात तब्बल चार हजार घरगुती शाडूच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा शाडूच्या मूर्तींमध्ये ८०० ने वाढल्याचा अंदाज आहे. पालिकेच्या पर्यावरण जनजागृती मोहिमेला चांगले यश मानले जात आहे.
पर्यावरणपूरक बदलाचा मुख्य कणा ठरला आहे, तो कऱ्हाडचा कुंभारवाडा. शहरात घरटी ५० ते ६० कारागीर गणेशमूर्ती साकारण्याच्या कामात व्यस्त असतात. पारंपरिक पद्धतीने स्वतःच्या हातांनी सुबक शाडूच्या मूर्ती बनवण्यामध्ये यंदा तरुण वर्ग सर्वात पुढे आहे. आधुनिकतेची जोड देत युवा कारागिरांनी यंदा कऱ्हाड शहरातच सुमारे चार हजार शाडूच्या मातीच्या मूर्ती तयार केल्या आहेत. हाताने काम करणाऱ्या या तरुण पिढीच्या कौशल्यामुळे यंदा शाडूच्या मूर्तींचे उत्पादन आणि मागणी दोन्ही गतवर्षीपेक्षा अधिक राहिली आहे.
शहरात दरवर्षी सुमारे १५ हजारच्या आसपास घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. पूर्वी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा भरणा अधिक असायचा. मात्र, त्यामुळे कृष्णा आणि कोयना नद्यांच्या पात्रात होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी पालिकेला व्यापक मोहीम हाती घेतली होती. शाळेतील विद्यार्थ्यांपासून विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून नागरिकांना शाडूच्या मातीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या मोहिमेला कऱ्हाडकरांनी दाद दिली आहे. यंदा १५ हजार मूर्तींपैकी थेट चार हजार कुटुंबांनी शाडूच्या मूर्तींना पसंती दर्शवली आहे.
--------------------
उत्तरदायित्वाची भावना

कुंभारवाड्यातील तरुण कारागिरांचे कौशल्य आणि कऱ्हाडकरांची निसर्गाप्रती असलेली उत्तरदायित्वाची भावना या दोन्ही गोष्टींचा सुरेख संगम यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे. कृत्रिम तलावातील विसर्जनालाही नागरिकांकडून प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. प्रबोधन आणि कुंभारवाड्यातील तरुण कारागिरांनी घेतलेले कष्ट यामुळेच कऱ्हाडात शाडूच्या मूर्तींचे प्रमाण वाढले आहे. जुन्या परंपरेला जपत नवीन पिढीने उभारलेला पर्यावरणपूरक लढा नक्कीच कौतुकास्पद आहे, असा विश्वास नागरिक व पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे.
------------------------

चौकट

तपशील आकडेवारी

घरगुती गणेशमूर्ती - १५ हजार
शाडूच्या गणेश मूर्ती - चार हजार (अंदाजे)
कुंभारवाड्यातील कारागीर - ५० ते ६० (घरटी)
मागील वर्षापेक्षा वाढ - ८०० मूर्ती
शाडूच्या मूर्ती वाढ टक्का - २६.६६ टक्के (सुमारे २७ टक्के)
---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com