खरीप पेरणी पोहोचली ९६ टक्क्यांवर

खरीप पेरणी पोहोचली ९६ टक्क्यांवर
Published on

खरीप पेरणी
९६ टक्क्यांवर

- गत वर्षीच्या तुलनेतील तूट ०.३ टक्क्यावर
- भाताच्या क्षेत्रात ३.२ टक्क्यांची घट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील खरीप पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र १ हजार १०४.४६ लाख हेक्टर असून, त्यापैकी जवळपास ९६ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. २१ ऑगस्टपर्यंत देशात १ हजार ५६.७० लाख हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १ हजार ७२.७७ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत पेरणी क्षेत्रातील तूट अवघी ०.३ टक्क्यावर आली आहे.
पेरणीचा कालावधी संपत आल्याने १५ ते २१ ऑगस्टदरम्यान शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून येते.
ऑगस्टच्या सुरुवातीला पेरणीतील तूट अधिक होती. ७ ऑगस्टपर्यंत गत वर्षीच्या तुलनेत पेरणी क्षेत्र सुमारे दोन टक्क्यांनी कमी होती. मात्र १५ ते २१ ऑगस्ट या एका आठवड्यात शेतकऱ्यांनी ४० लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी केली. गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे ३५ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यामुळे पेरणी क्षेत्रातील तूट झपाट्याने कमी झाली.

भाताचे क्षेत्र १३ लाख हेक्टरने कमी
प्रमुख खरीप पीक असलेल्या भाताच्या क्षेत्रात मात्र घट कायम आहे. २१ ऑगस्टपर्यंत भाताची लागवड ४०५.१० लाख हेक्टरवर झाली. गेल्या वर्षी याच काळात ती ४१८.२९ लाख हेक्टर होती. म्हणजेच भाताचे क्षेत्र १३.१९ लाख हेक्टरने, अर्थात ३.२ टक्क्यांनी घटले आहे. ७ ऑगस्टपर्यंत ही तूट ४.४ टक्के होती. गेल्या दोन आठवड्यांत भात लागवडीला वेग आल्याने ही तूट काही प्रमाणात भरून निघाली आहे. केंद्र सरकारने यंदाच्या खरीप हंगामासाठी १२३.१५ दशलक्ष टन भात उत्पादनाचे लक्ष्य निश्चित केले आहे.
भात क्षेत्रातील घटीमध्ये मध्य प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि झारखंड या राज्यांचा मोठा वाटा आहे. कर्नाटकात सर्वाधिक ३.०९ लाख हेक्टर, तेलंगणात २.४५ लाख, झारखंडमध्ये १.८८ लाख, मध्य प्रदेशात १.७५ लाख, ओडिशात १.६३ लाख, तर महाराष्ट्रात १.५० लाख हेक्टरने भात क्षेत्र घटले आहे.

कडधान्य क्षेत्रात वाढ
कडधान्यांची पेरणी गेल्या वर्षीपेक्षा वाढली आहे. सर्व कडधान्यांचे क्षेत्र ११३.६३ लाख हेक्टरवर पोहोचले असून, गेल्या वर्षी ते ११२.१४ लाख हेक्टर होते. तुरीचे क्षेत्र ४३.४४ लाख हेक्टरवरून ४३.८६ लाख हेक्टर, तर उडदाचे क्षेत्र २१.७२ लाख हेक्टरवरून २४.३८ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. मुगाचे क्षेत्र मात्र ३३.९३ लाख हेक्टरवरून ३२.६८ लाख हेक्टरपर्यंत कमी झाले आहे.

सोयाबीन, मक्याचे क्षेत्र घटले
तेलबियांचे एकूण क्षेत्र किरकोळ घटून १८८.३७ लाख हेक्टर झाले. गेल्या वर्षी ते १८८.६९ लाख हेक्टर होते. सोयाबीनची पेरणी गेल्या वर्षीच्या १२२.७६ लाख हेक्टरवरून १२१.३५ लाख हेक्टरपर्यंत कमी झाली. भुईमुगाचे क्षेत्र मात्र ४८.२२ लाख हेक्टरवरून ४८.७९ लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे.
भरडधान्यांचे क्षेत्र १.९ टक्क्याने घटून १७६.३६ लाख हेक्टर झाले. मक्याचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या ९३.३० लाख हेक्टरवरून ८९.५१ लाख हेक्टरपर्यंत कमी झाले. ज्वारीचे क्षेत्र १२.६१ लाख हेक्टरवरून १३.४१ लाख हेक्टर आणि बाजरीचे क्षेत्र ६३.३३ लाख हेक्टरवरून ६४.६८ लाख हेक्टरपर्यंत वाढले. नाचणीचे क्षेत्र मात्र ६.६० लाख हेक्टरवरून ४.८१ लाख हेक्टरपर्यंत घटले आहे.
कापसाचे क्षेत्रही किंचित घटले आहे. गेल्या वर्षी २१ ऑगस्टपर्यंत १०८.७३ लाख हेक्टरवर कापूस होता. यंदा हे क्षेत्र १०८.४५ लाख हेक्टर आहे. ताग आणि मेस्ताचे क्षेत्र मात्र ६.२३ लाख हेक्टरवरून ६.३४ लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे.

खरीप पेरणीचा लेखाजोखा
पीक २०२५ (लाख हेक्टर) २०२६ (लाख हेक्टर) बदल
भात ४१८.२९ ४०५.१० -३.२ टक्के
कडधान्ये ११२.१४ ११३.६३ +१.३ टक्का
भरडधान्ये १७९.८१ १७६.३६ -१.९ टक्का
तेलबिया १८८.६९ १८८.३७ -०.२ टक्का
ऊस ५८.८७ ५८.४४ -०.३ टक्का
कापूस १०८.७३ १०८.४५ -०.७ टक्का
एकूण खरीप १,०७२.७७ १,०५६.७० -०.३ टक्का

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com