

खटाव परिसरात वीजपुरवठा सुरळीत करा
प्रदीप विधाते, राहुल पाटील यांची महावितरणला मागणी
पुसेगाव, ता. ७ : खटाव, पुसेगावसह नेर, बुध, दरुज, दरजाई भागातील वीजपुरवठ्यात सुरळीत करावा. अन्यथा गुरुवारी खटाव येथील वीज वितरणच्या उपविभागीय कार्यालयावर शेतकरी व महिलांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते आणि खटाव - माण ॲग्रो प्रोसेसिंगचे संचालक राहुल पाटील यांनी दिला आहे.
प्रदीप विधाते म्हणाले, ‘‘खटाव तालुक्यात सध्या पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. विहिरी व बोअरवेलमध्ये थोडेफार पाणी उपलब्ध असले, तरी लाईटअभावी ते पिकांना देता येत नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था ‘पाणी असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली आहे. सोयाबीनसह इतर खरीप पिके आणि उसालाही सध्या पाण्याची गरज असताना वीजपुरवठाच होत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे.
राहुल पाटील म्हणाले, ‘‘गावाबाहेर आणि शेतात असलेल्या अनेक घरांनाही अनियमित वीजपुरवठ्याचा फटका बसत आहे. वीज नसल्याने महिलांना घरातील कामांसह कडबाकुट्टीसारखी दैनंदिन कामेही करता येत नाहीत. अनेक कुटुंबांना अंधारातच दिवस काढावे लागत आहेत.’’
खटावमध्ये विद्युत रोहित्रे जळण्याचे प्रमाणही मोठे आहे. आतापर्यंत सुमारे १४ ते १५ डीपी जळाले असून, एखादा डीपी जळाल्यानंतर तो बदलण्यासाठी दोन-दोन महिने लागतात. डीपी बसविल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत पुन्हा जळण्याचे प्रकार घडत असल्याने वीज वितरण विभागाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.
वीजपुरवठ्याबाबत तक्रारी करूनही विद्युत विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने संतापाचा उद्रेक होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता आश्वासन नको, तर नियमित आठ तास वीज हवी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. चार दिवसांत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास गुरुवारी शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने एकत्र येऊन खटाव येथील वीज वितरणच्या उपविभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा विधाते व पाटील यांनी दिला आहे.
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.